Magic trick mystery 1970s : जादूची वेगळी दुनिया असते आणि त्या दुनियेचं आकर्षण देखील प्रत्येकाला असतं. समोर उभा असलेला जादूगार दिसायला सामान्य असतो, पण तो अशा जादू दाखवतो ज्यामुळे खास ठरतो… जगात आतापर्यंत अनेक जादूगार होऊन गेले. पण एक जादूगार असा होता, ज्याने एका झटक्यात हजारो लोकांना गायब केलं. त्यानंतर अनेक वर्ष गायब झालेल्या लोकांचा काही पत्ताच लागला नाही. सध्या ज्या जादूगरची चर्चा रंगली आहे, तो दुसरा तिसरा कोणी नाही तर, व्हिक्टर वेन (Victor Vain) आहे. 1970 च्या दशकात व्हिक्टर वेन याने असा करिश्मा केला, जो आज ही जादू प्रेमीमध्ये चर्चेत आहे आणि ती घटना एक रहस्यमय घटना समजली जात आहे.
असं सांगितलं जातं की, 1975 मध्ये लास वेगास येथील एका मोठ्या नाट्यगृहात व्हिक्टर वेन आपला कार्यक्रम सादर करत होते. हजारो उत्साही प्रेक्षकांनी सभागृह खच्चून भरलं होतं. कार्यक्रमाच्या क्लाइमेक्सवर जादूगाराने प्रेक्षकांना सांगितलं, ‘स्वतःचे डोळे मिटा आणि हळूहळू 1 ते 10 पर्यंत आकडे मोजा.” लोकांनी उत्साहाने मोजायला सुरुवात केली. मात्र, ते ’10’ म्हणणार इतक्यातच संपूर्ण सभागृह रिकामं झालं होतं. खुर्च्या रिकाम्या झाल्या होत्या आणि तिथे काही हॅट्स तशाच पडून होत्या. जादूगार व्हिक्टर वेन सुद्धा मंचावरून गायब झालेले. नाट्यगृहातील कर्मचारीवर्ग देखील अवाक् झाला. सुरक्षा रक्षकांनी त्वरित शोध सुरू केला, पण कोणाचा थांगपत्ता सुद्धा लागला नाही.
आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली ही घटना तेव्हा इतकी भयानक झालेली की, पोलीस देखील हैराण झालेले. काहींना असं वाटलं की ही खरी जादू आहे, तर जादूच्या जगातील तज्ज्ञांनी याला एक भव्य, मोठ्या प्रमाणावरील भ्रम मानले. त्या काळात, लास वेगासमधील नाट्यगृहे त्यांच्या अत्याधुनिक रंगमंचीय यंत्रणा, आरसे, प्रकाशयोजनेचे प्रयोग आणि भूमिगत मार्गांसाठी प्रसिद्ध होती.
नंतर, विविध सिद्धांत पुढे आले. ज्यात असं सुचवण्यात आलं की प्रेक्षकांना दुसऱ्या सभागृहात किंवा ठिकाणी हलवण्यात आलं होतं, किंवा मोठे सापळे आणि गुप्त बाहेर पडण्याचे मार्ग वापरले गेले होते. पण असं काही झालं होतं तर, लोकांचा गोंधळ नक्कीच झाला असता. पण तसं देखील काही झालं नाही. त्यामुळे प्रेक्षक आणि स्वतःचा जादूगार कुठे गायब झाला याबद्दल काहीही कळलं नाही.
कोण होता व्हिक्टर वेन?
व्हिक्टर वेन हे 1970 च्या दशकातील एक प्रसिद्ध जादूगार होते, जे त्यांच्या कसरतींसाठी ओळखले जात होते. या घटनेनंतर ते अचानक नाहीसे झाले. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी वेगळ्या नावाने छोटे कार्यक्रम करणं सुरू ठेवलं होतं, परंतु त्या घटनेबद्दल त्यांनी कधीच काहीही भाष्य केले नाही. त्यांची खरी ओळख आणि त्यानंतरचे त्यांचे आयुष्य हे आजही एक गूढच राहिलं आहे.