Iran Rescue 23 Crew Members: इराण आणि अमेरिकेत पुन्हा शिलगली आहे. दोन्ही देशात युद्ध भडकले आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार हल्ले वाढले आहेत. दरम्यान होर्मुज समुद्रधुनीत आज एक भीषण अपघात घडला. दोन जहाजांमध्ये मोठी टक्कर झाली. ही टक्कर इतकी भीषण होती की एक जहाजाच्या ठिकऱ्या उडाल्या. यावेळी इराणच्या माणुसकीचे दर्शन जगाला घडले. इराणच्या नौदलाने त्या जहाजावरील कर्मचाऱ्यांसह 23 लोकांचे प्राण वाचवले. त्यांची सुटका केली. अमेरिका आणि इराण युद्ध सुरू असताना ही घटना घडली.
तातडीने बचाव कार्याला सुरुवात
इराणच्या केश्म(Qeshm) बेटाच्या उत्तरेस हा अपघात घडला. दोन जहाजांची जोरदार टक्कर झाली. बल्क कॅरिअरवरील 23 खलाशांना वाचवण्यात मंगळवारी यश आले. त्यांना जहाजातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. इराणच्या फार्स न्यूज एजन्सीने याविषयीचे वृत्त दिले. त्यानुसार, दक्षिणेकडील अब्बास बंदर शहरातील अधिकाऱ्यांना अगोदर मंगळवारी पहाटे समुद्रात दोन जहाजांची टक्कर झाल्याची माहिती मिळाली.
प्राथमिक तपासात एका बल्क कॅरिअर जहाज समुद्रात दुसर्या जहाजाला धडकल्याचे कळले. होरमुजगान प्रांताच्या सागरी शोध आणि बचाव केंद्राच्या समन्वयाने एक पायलट बोट आणि इतर बोटी तातडीने मदतीसाठी पाठवण्यात आल्या. बल्क कॅरिअरला मोठा फटका बसला. जहाजाच्या मध्यभागाला सर्वात मोठा फटका बसला. जहाजात पाणी शिरले. कॅप्टनने सर्व खलाशांना तात्काळ जहाज सोडण्याचे आदेश दिले होते. इराणच्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये 23 खलाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. हे सर्व कर्मचारी केश्म बेटावर नेण्यात आले.
केश्म बेटावर सहा स्फोट
ही दोन जहाजं कशी धडकली याचा तपास सुरू आहे. या अपघाताचे कारण अद्याप समोर आलेले नाही. दरम्यान इराणची सरकारी वृत्तसंस्था IRNA ने एक मोठी वार्ता दिली आहे. त्यानुसार अब्बास बंदरावर स्फोटाचे आवाज ऐकू आले. तर किश बेटावर सहा स्फोट झाल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला आहे. होर्मुज समुद्रधुनीत अमेरिका आणि इराणमध्ये तणाव वाढल्यानंतर स्फोटाच्या मालिका सुरू आहेत. गेल्या तीन दिवसांपासून दोन्ही देशात वातावरण तणावपूर्ण आहे. जूनमध्ये वॉशिंग्टन आणि तेहराण यानी एक सामंजस्य करार केला होता. कतार आणि पाकिस्तानच्या मदतीने दोन्ही देशात युद्धविराम झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. पण होर्मुज समुद्रधुनीतील वाहतुकीवरून पुन्हा एकदा संघर्ष पेटला आहे. दोघांनीही या कराराला केराची टोपली दाखवली आहे. दोन्ही देशात संघर्ष वाढला आहे.