लिंबू, पाणी, सुगंधी द्रव्य आणि टाचणी… राऊत प्रकरणात कोर्टात काय काय घडलं? शिवाजी महाराजांनी दिलेल्या दर्ग्याचाही उल्लेख
Tv9 Marathi July 15, 2026 01:45 AM

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि सिंधुदुर्गचे माजी खासदार विनायक राऊत हे कौटुंबिक कलहामुळे चर्चेत आहेत. विनायक राऊत आणि त्यांच्या मुलावर सून गिरीजा यांनी गंभीर आरोप केले आहेत. विनायक राऊत आणि त्यांचा मुलगा गीतेशने खोटं बोलून माझी आणि माझ्या कुटुंबाची फसवणूक केली. माझा मानसिक आणि भावनिक छळ केला. 2017 साली आमचं लग्न झालं. पण 2018 सप्टेंबरपर्यंत आमच्यात शारीरिक संबंध आले नाहीत. माझ्या बरोबर अघोरी कृत्य करण्यात आली. मला वेगवेगळ्या बाबा बुवांकडे नेलं. त्यांनी वेगवेगळे उतारे टाकले असा आरोप केला आहे. आज या प्रकरणाची सुनावणी ठाणे कोर्टात पार पडली. यावेळी कोर्टात काय काय घडलं ते जाणून घेऊयात.

दर्ग्यातून लिंबू, टाचणी, काळा धागा, सुगंधी द्रव्य आढळले…

आजच्या सुनावणीवेळी तपास अधिकारी संदीप धांडे यांनी सांगितले की, ‘दोन दिवस फिरोज शेखची चौकशी करता आली नाही. राम यलप्पा वडार याला सिंधुदुर्ग मधून अटक केलेली आहे. त्या तपासासाठी आम्हाला आणखीन वेळ मिळावा. त्या बाबाच्या दर्ग्यातून लिंबू, टाचणी, काळा धागा, सुगंधी द्रव्य मिळून आले आहेत. सुगंधी द्रव्य कोणाकडून घेतले? लिंबू कोणाकडून घेतले याची आम्हाला चौकशी करायची आहे. विनायक राऊत यांच्या गावातल्या घरी फिरोज शेख बाबा आघोरी कृत्य करायला गेला होता. त्यानंतर पाच गुरुवार त्यांनी गिरीजा राऊत यांना बोलवले. या दर्ग्यामध्ये लिंबू, लिंबाचे झाड पान, पाणी आणि सुगंधित द्रव्य हे उतरवण्यात आले त्यामुळे गिरीजा राऊत यांना त्रास जाणवत होता.’

पुढे बोलताना संदीप धांडे यांनी म्हटले की, ‘आर्थिक पैशांच्या व्यवहारासंबंधित चौकशी करण्यासाठी वेळ देण्यात यावा. तसेच गुरुवारी आणि शनिवारी जे भक्त येत होते, त्यांच्यावर पण अशी अघोरी कृत्य झाली असल्याच एका वृत्तपत्रामध्ये बातमी आलेली आहे. त्या गावांमध्ये गावकऱ्यांनी स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केलेली आहे. सिंधुदुर्गात जाण्या-येण्यासाठी 11 ते 12 तास लागतात. पुरेशी चौकशी करण्यासाठी आम्हाला सात दिवसाची पोलीस कस्टडी द्यावी अशी मागणी आहे. ‘

शिवाजी महाराजांनी दिलेला दर्गा

आरोपी फिरोज शेख यांच्या वकीलाने युक्तिवाद करताना म्हटले की, ‘फिरोज शेखला दोन दिवस पोलीस कोठडी दिली होती. आठ वर्षानंतर ही केस का येते? दर्गावर पाणी देणे हे काय गुन्हा आहे का? दर्गावर गुरुवारी आणि शनिवारी ते पोथी वाचायला यायचे. दर्ग्यामध्ये जाऊन पूजा पाठ करणे हे गुन्हा आहे का? दर्ग्यामध्ये लिंबू आणि पाणी आढळल्याने त्यात काय संशय आहे? दापोली मध्ये एक दर्गा आहे जो शिवाजी महाराज यांनी दिला होता. फिरोज शेख यांना MCR द्यावा.

अघोरी विद्या करण्यात आली…

गिरीजा राऊत यांचे वकील अक्षय माने यांनी म्हटले की, बाबा फिरोज शेख यांच्या दर्ग्यातून लिंबू, पाणी, सुगंधी द्रव्य, टाचणी हे आढळून आले आहे. जादूटोणा करण्यात आला आहे. अघोरी विद्या देखील करण्यात आली आहे. सखोल तपासासाठी आणखीन काही दिवस पोलीस कोठडी मिळावी यासाठी मागणी केली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.