Coach Gurpreet Maras: स्वप्न राहिले अपूर्ण, शिष्य करताहेत पूर्ण; माजी बुद्धिबळपटू व प्रशिक्षक गुरप्रीतसिंग घडवितोय भविष्यातील तारे
esakal July 20, 2026 01:45 PM

नरेंद्र चोरे

नागपूर: अफाट गुणवत्ता असूनही ‘तो’ उमेदीच्या काळात बुद्धिबळातील प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय मास्टर (आयएम) तसेच ग्रॅण्डमास्टर (जीएम) किताब मिळवू शकला नाही. मात्र, त्यानंतर प्रशिक्षक बनून त्याने अनेक ‘आयएम’ व ‘जीएम’ तयार करून आपले अपूर्ण स्वप्न पूर्ण केले. ही प्रेरणादायी कहाणी आहे माजी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू व प्रशिक्षक गुरप्रीतसिंग मरासची. ३९ वर्षीय गुरप्रितने जवळपास दीड दशकाच्या करिअरमध्ये जिल्हा, विभागीय, राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक विजेतीपदे जिंकली.

अष्टपैलू खेळाच्या बळावर त्याने ‘स्पोर्ट्स कोट्या’तून डिफेन्स अकाउंट विभागात सीनियर ऑडिटरपदी झेपही घेतली. मानसन्मान, प्रतिष्ठा व पैसा मिळवूनही स्वतः ‘आयएम’ किंवा ‘जीएम’ बनू न शकल्याचे शल्य मात्र नेहमीच त्याला बोचत राहिले. खेळाडू म्हणून अपूर्ण राहिलेल्या इच्छाआकांक्षा आता तो गुरू बनून आपल्या शिष्यांकडून जिद्दीने पूर्ण करवून घेत आहे.

Soya Bean Seed Scam: बोगस बियाणे प्रकरणी कंपन्यांवर कारवाईची ‘कृषी’कडून शिफारस; अमरावती १००७, यवतमाळ ८३२, वर्धा ३३३ तर नागपुरात ५० तक्रारी

सद्यःस्थितीत गुरप्रीतच्या मार्गदर्शनाखाली ‘वर्ल्ड चॅम्पियन’ दिव्या देशमुखसह ग्रॅण्डमास्टर रौनक साधवानी, शौनक बडोले, चेसमास्टर संकल्प गुप्ता, महिला आंतरराष्ट्रीय मास्टर मृदुल डेहनकर, सृष्टी पांडे, फिडेमास्टर सिद्धांत गवई, निहांश खोडे, सहेजवीरसिंग मराससारखे ३० च्या वर चॅम्पियन खेळाडू ऑनलाइन व ऑफलाइन पध्दतीने बुद्धिबळाचे धडे गिरवीत आहेत.

यातील बहुतांश खेळाडूंनी चौसष्ट घरांच्या या खेळात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेऊन आपल्या गुरूसह उपराजधानीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. गुरप्रीतच्या मते, नागपुरात टॅलेंटची अजिबात कमतरता नाही. आजच्या घडीला त्यांना फक्त मार्गदर्शन आणि योग्य दिशा दाखविण्याची गरज आहे.

युवा खेळाडूंना प्रायोजकांचे पाठबळ आवश्यक आज बुद्धिबळाचा खेळ अत्यंत महागडा झाला आहे. विविध स्पर्धांच्या निमित्ताने खेळाडूंना परदेशवारी करावी लागते. त्यामुळे गरीब किंवा सर्वसाधारण घरातील खेळाडू इच्छा असूनही अपेक्षित प्रगती साधू शकत नाही. अशा स्थितीत मोठमोठ्या कंपन्या किंवा प्रायोजकांनी गुणवान खेळाडूंना पाठबळ मिळाल्यास नागपूर व विदर्भातील चित्र बदलू शकते. दक्षिण भारतात प्रज्ञानंदसारख्या अनेक गरीब बुद्धिबळपटूंसाठी मदतीचे हात पुढे आल्यामुळे तो व अन्य खेळाडू अधिक प्रगती करीत असल्याचे गुरप्रितने यावेळी सांगितले.

Kolhapur FIFA Football Craze : अख्खं कोल्हापूर रात्रभर जागतं होतं! अर्जेंटिना-स्पेन फायनलसाठी शहरात मोठी स्क्रीन, फुटबॉलप्रेमींनी भर पावसात लुटला आनंद; पाहा खास फोटो

जलदगतीऐवजी क्लासिकलवर भर हवा गुरप्रितने एका गोष्टीवर नाराजीही व्यक्त केली. त्याच्या मते, नागपुरात सद्यःस्थितीत क्लासिकलच्या तुलनेत जलदगती स्पर्धांवरच अधिकाधिक भर दिला जात आहे. क्लासिकल किंवा मोठ्या स्पर्धांमध्ये तासन्तास चाली खेळाव्या लागत असल्याने त्यात बुद्धिबळपटूच्या मानसिक कणखरतेचा खरा कस लागतो. शिवाय मोठ्या स्पर्धांच्या माध्यमातून अधिकाधिक रेटिंग गुणही मिळविण्याची संधी राहाते. दुर्दैवाने अलीकडच्या काळात अशा स्पर्धा क्वचितच होता आहेत. नागपूर जिल्हा बुद्धिबळ संघटना व चेस असोसिएशन नागपूरने या दिशेने प्रयत्न करावे, असे तो म्हणाला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.