Cooking Hacks : हॉटेलसारखी चव हवीय? या 12 कुकिंग ट्रिक्स एकदा वापरूनच पाहा
Marathi July 27, 2026 01:24 AM

हॉटेलमध्ये मिळणाऱ्या भाज्या, पनीर, बिर्याणी किंवा ग्रेव्हीची चव घरी कितीही प्रयत्न केले तरी तशी जमत नाही, अशी तक्रार अनेकांची असते. अनेकांना वाटतं की त्यामागे एखादा खास मसाला किंवा महागडी सामग्री असते. पण प्रत्यक्षात फरक पडतो तो स्वयंपाक करण्याच्या पद्धतीमुळे. प्रोफेशनल शेफ काही छोट्या पण महत्त्वाच्या ट्रिक्स वापरतात. यामुळे पदार्थांचा रंग, सुगंध, टेक्स्चर आणि चव अधिक उठून दिसते. या ट्रिक्स घरच्या स्वयंपाकातही सहज वापरता येतात. जाणून घेऊयात नेमक्या कोणत्या आहेत त्या कुकिंग ट्रिक्स.

1) हिरव्या भाज्यांचा रंग ताजा ठेवणे
पालक, मटार, फरसबी किंवा ब्रोकोली शिजल्यानंतर लगेच बर्फाच्या पाण्यात टाका. त्यामुळे भाज्यांचा हिरवा रंग आणि कुरकुरीतपणा टिकून राहतो.

2) ग्रेव्हीला रेस्टॉरंटसारखा फिनिश द्या
भाजी किंवा ग्रेव्ही तयार झाल्यावर गॅस बंद करण्याच्या अगदी आधी थोडंसं थंड बटर, तूप किंवा फ्रेश क्रीम मिसळा. यामुळे ग्रेव्ही अधिक रिच, चमकदार आणि चविष्ट लागते.

3) मसाले थेट तेलात टाकू नका
हळद, तिखट, धणे-जिरे पावडर थोड्या पाण्यात मिसळून पेस्ट तयार करा आणि मग फोडणीत घाला. त्यामुळे मसाले जळत नाहीत आणि त्यांचा सुगंध अधिक खुलतो.

4) चव फिकी वाटत असेल तर…
अनेकदा पदार्थाला थोडासा लिंबाचा रस किंवा काही थेंब व्हिनेगर घातल्याने चवीचा समतोल साधला जातो. त्यामुळे फ्लेवर अधिक प्रखरतेने कळतो.

5) कुरकुरीत टेक्स्चरसाठी
बटाटे, पनीर किंवा इतर भाज्या फ्राय करण्यापूर्वी टिश्यू पेपरने त्यावरील ओलावा पूर्णपणे पुसून टाका. त्यामुळे बाहेरून छान कुरकुरीत टेक्शर मिळतो.

6) मीठ घालण्याची पद्धत
शेफ संपूर्ण मीठ शेवटी घालत नाहीत. कांदा परतताना, भाज्या घालताना आणि शेवटी चवीनुसार थोडे मीठ घातल्याने प्रत्येक घटकात चव मुरते.

7) कांदा सोनेरी करण्याची पद्धत
कांदा परतताना चिमूटभर मीठ आणि अगदी थोडी साखर घाला. त्यामुळे कांदा लवकर कॅरमलाइज होतो आणि ग्रेव्हीचा रंग सुंदर येतो.

8) कसुरी मेथी वापरण्याची पद्धत
कसुरी मेथी थोडीशी कोरडी भाजून हातावर चोळून शेवटी भाजीत घाला. त्यामुळे रेस्टॉरंटसारखा खमंग सुगंध येतो.

9) भाज्या चिरणे
वेगवेगळ्या आकाराच्या भाज्या एकसारख्या शिजत नाहीत. त्यामुळे शक्यतो सर्व भाज्या समान आकारात चिरल्यास पदार्थ अधिक आकर्षक दिसतो आणि समान शिजतात.

10) तयार पदार्थाला थोडा ‘रेस्ट’ द्या
भाजी, पुलाव किंवा बिर्याणी तयार झाल्यावर लगेच सर्व्ह न करता ५ ते १० मिनिटे झाकून ठेवा. यामुळे मसाल्यांचे फ्लेवर अधिक छान मिसळतात.

11) आचेचा योग्य वापर
प्रत्येक पदार्थ एकाच आचेवर शिजत नाही. काही पदार्थ सुरुवातीला मोठ्या आचेवर आणि नंतर मंद आचेवर शिजवल्यास त्यांची चव आणि पोत अधिक चांगला राहतो.

चविष्ट स्वयंपाकाचं रहस्य फक्त मसाल्यांमध्ये नसतं, तर योग्य वेळ, योग्य आच आणि योग्य तंत्र यात असतं. या छोट्या शेफ ट्रिक्सचा वापर केल्यास साधी भाजी, आमटी किंवा पुलावही अधिक रुचकर आणि हॉटेलसारखा वाटू शकतो.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.