ते अजिबात 'कूल' नव्हतं, जेन-झींनाही आवडलं नव्हतं..; सलमान खानवर लेखिकेची जोरदार टीका
Tv9 Marathi July 29, 2026 04:45 PM

बॉलिवूडचा ‘दबंग’ अभिनेता अर्थात सलमान खान जे करतो, ते सोशल मीडियावर चर्चेचा विषय राहिल्याशिवाय राहत नाही. सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असणाऱ्या सलमानचे पोस्ट वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होतात. सोशल मीडिया अकाऊंट्स सांभाळण्यासाठी त्याच्यासाठी टीम असली तरी सलमान त्याच्या पोस्टमध्ये असं काहीतरी आवर्जून लिहितो, ज्यामुळे लोकांचं लक्ष वेधलं जातं. अशीच काहीशी पोस्ट त्याने विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान लिहिली होती. शास्त्रज्ञ आणि सोनम वांगचूक यांना उपोषण सोडण्याचं आवाहन करताना सलमानने त्यांचा उल्लेख ‘ब्रो’ असा केला होता. यावरून आता लेखिका शोभा डे यांनी जोरदार टीका केली आहे.

कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली दिल्लीतल्या जंतर-मंतर याठिकाणी झालेल्या आंदोलनादरम्यान सलमान खानने सोशल मीडियावर पोस्ट लिहित प्रतिक्रिया दिल्या होत्या. यातील एका पोस्टमध्ये त्यांनी उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचूक यांचा उल्लेख ‘ब्रो’ (भाऊ) असा केला होता. हीच गोष्ट आता शोभा डे यांना अजिबात आवडली नाही. सोशल मीडियावर त्यांनी याबद्दल लिहिलं, ‘सलमान खानसोबतही असंच घडलंय. सोनम वांगचूक यांना ‘ब्रो’ म्हणणं आणि त्यांचं उपोषण सोडवण्यासाठी खान कुटुंबाच्या किचनमधून घरचं जेवण पाठवण्याविषयी बोलणं, हे लोकांना अजिबात आवडलेलं नाही. सलमानची मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवली गेली. कदाचित त्याला असं वाटलं असेल की तो ‘कूल’ दिसण्याचा प्रयत्न करत आहे. पण ‘जेन-झी’ने कूलची व्याख्याच बदलून टाकली आहे. हा त्याचा विचित्र मेसेज कोणत्याच दृष्टीने कूल नव्हता.’

सलमानने काय लिहिलं होतं?

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)


विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान सलमान खानने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं होतं, ‘शिक्षण आणि सुरक्षा या दोन्ही गोष्टींबाबत विद्यार्थी हे आपले सर्वोच्च प्राधान्य आहेत, त्यामुळे त्यांनी आणि त्यांच्या पालकांनी काळजी करण्याची गरज नाही. माननीय पंतप्रधानांनी ट्विट केलंय आणि मला खात्री आहे की ते या पेपरफुटीसाठी जबाबदार असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई करतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनो, कृपया तुमच्या पालकांकडे आणि घरी परत जा. सोनम, आता पुरे झालं ब्रो. यापुढे जास्त ताणू नकोस. गरज पडल्यास हा उत्साह दुसऱ्या दिवसासाठी जपून ठेव. पण मला वाटत नाही की गरज पडेल. काहीतरी खा किंवा पी. वाटल्यास मी घरून जेवण पाठवतो.’

शोभा डे यांनी सलमानच्या या पोस्टवर सडकून टीका केली आहे. यावेळी त्यांनी अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत आणि इतर सेलिब्रिटींनाही लक्ष्य केलं.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.