पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
सोमेश कोलगे July 29, 2026 05:13 PM

नवी दिल्ली : लोक परीक्षा संसोधन विधेयकावर सुरू असलेल्या चर्चेत आज लोकसभा विरोधी पक्षनेते तथा खासदार राहुल गांधींनी (Rahul gandhi) सहभाग घेतला. यावेळी, दिल्लीतील जंतरमंतरवर झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीचार्जचा मुद्दा चांगलाच गाजला. राहुल गांधींनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवरच (Amit Shah) लाठीचार्ज आणि बंदुकातून पॅलेटगन वापरल्याचे आरोप केले. त्यावरुन, सभागृहात चांगलाच गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. राहुल गांधींच्या वक्तव्यावर आक्षेप घेत संसदीय कामकाजमंत्री किरण रिजीजू यांनी तुमच्याकडे काय पुरावा आहे, असा प्रतिसवाल केला.  

लोकसभेतील चर्चेवेळी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनीही दिल्लीतील आंदोलनावर झालेल्या मारहाणीवरुन सरकारला लक्ष्य केलं. जे लोकांच्या श्रद्धेशी खेळू शकतात, ते तरुणांच्या भविष्याशीही खेळू शकतात. देशातील सर्वात मोठे संकट स्वत: सरकारच बनले आहे, अशी टीका अखिलेश यादव यांनी केली. त्यानंतर, राहुल गांधींनी सरकार आणि गृहमंत्री अमित शाहांवर जोरदार हल्लाबोल केला. सर्व राजकीय पक्षांनी, ज्यात भाजपमधील माझ्या मित्रांचाही समावेश आहे, विद्यार्थ्यांच्या भावनांचा (विद्यार्थी आंदोलन) आदर केला पाहिजे. जे काही घडलं आहे त्यात काहीही चुकीचं नाही आणि प्रत्येक भारतीयाला त्याचा अभिमान वाटला पाहिजे. भाजपमधील माझ्या मित्रांनी जर त्यांच्या स्वतःच्या मुलांना विचारले की त्यांचे भाऊ-बहीण जे करत आहेत त्याबद्दल त्यांना काय वाटते? तर त्यांना त्यांच्या मुलांचेही त्याबाबत समर्थनच मिळेल, असे राहुल गांधींनी म्हटले. 

गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप, मंत्र्यांचा पलटवार

आंदोलक विद्यार्थ्यांवर अभिमान असायला हवा. देशातील युवकांचा आदर होणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांचा राग योग्य आहे. शिक्षणाच्या मुद्द्यावर तरुणांना रस्त्यावर उतरावं लागलं. जगात तीन प्रकारचे लोक आहेत. एक विद्यार्थी, दुसरा मूर्ख आणि तिसऱ्या प्रकारचे लोक म्हणजे मूर्खाला देव मानणारे अंधभक्त, अशा शब्दात राहुल गांधींनी आंदोलकांवर टीका करणाऱ्यांना सुनावलं. धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते चालवलं फक्त आरएसएसनं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसशी निगडीत आहे. या देशाच्या तथाकथित गृहमंत्र्यांमध्ये संसदेत बसण्याचे धाडस नाही. मी गृहमंत्र्यांना पाहिले, तो ताफा पाहिला, 30 गाड्या आणि त्यातील एका गाडीत बसलेले गृहमंत्री. ते थरथरत होते. गृहमंत्र्यांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, बंदुका, पॅलेट गन वापरण्याचे आदेश दिले, असा आरोप राहुल गांधींनी सभागृहात केला. तर, राहुल गांधींना हे कोणी सांगितलं, राहुल गांधी कशाच्या आधारावर बोलत आहेत? अशा खोट्या आरोपाप्रकरणी त्यांनी माफी मागावी, अशी मागणी संसदीय कार्यमंत्री किरण रिजीजू यांनी केली. तसेच, तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? असा सवाल देखील रिजीजू यांनी केला. 

शिक्षणमंत्र्यांच्या कृतीवर टीका

मी फक्त सत्यच बोलले, मी असे काय बोलले जे असंसदीय होते? सत्य बोलल्याबद्दल जर त्यांना मला शिक्षा करायची असेल, तर त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. मी सत्य बोलतच राहीन, असे खासदार प्रियांका गांधी यांनी म्हटलं. मंगळुरूमधील एका पबमध्ये महिलांवर झालेल्या हल्ल्याची एक घटनाही आम्ही पाहिली. या घटनेत सामील असलेल्या व्यक्तीला शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी यांनी भाजपमध्ये प्रवेश दिला होता. काही तासांनंतर त्याला पक्षातून काढून टाकण्यात आले असले तरी, त्याच्या भाजपमध्ये सामील झाल्याचे फोटो उपलब्ध आहेत. त्यामुळे, ही केवळ एका घटनेची बाब नाही, तर यातून महिलांप्रति असलेली त्यांची विचारसरणी आणि दृष्टिकोन दिसून येतो, असे म्हणत प्रियंका गांधींनी लोकसभेत शिक्षणमंत्र्यांच्या कृतीवर आक्षेप घेतला.

राहुल गांधींनी संसदेत मुर्खांची व्याख्या सांगितली, अंधभक्तांच्या उल्लेखाने भाजप खासदार संतापले, लोकसभेत प्रचंड गोंधळ

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.