Pune Baramati Crime News Mangesh Jagtap: दोन दिवसांपूर्वी पुणे जिल्हा परिषदेच्या (Pune Zilla Parishad) सर्वसाधारण सभेत झालेल्या नाट्यमय राड्यानंतर अखेर बारामतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप (Mangesh Jagtap) यांच्यावर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणे आणि आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गंभीर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी पीडित तरुणी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती आघाडीच्या बारामती अध्यक्ष भाग्यश्री धायगुडे (Bhagyashree Dhaygude) यांच्या तक्रारीवरून पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपासासाठी हा गुन्हा बारामती तालुक्यातील माळेगाव पोलीस ठाण्यात (Malegaon Police Station) वर्ग करण्यात आला आहे.
पीडित तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, मंगेश जगताप आणि त्यांचे कॉलेज जीवनापासून म्हणजेच सुमारे 21 वर्षांचे प्रेमसंबंध होते. मंगेश यांनी लग्नाचे आश्वासन देऊन अनेक वर्षे हे संबंध कायम ठेवले. मात्र, काही काळाने मंगेश यांनी गुपचूप दुसरे लग्न केल्याचे समोर आले. याबाबत विचारणा केली असता, मंगेश यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट देणार असल्याचे सांगून काही कागदपत्रे दाखवली; परंतु ही सर्व कागदपत्रे बनावट असल्याचे तपासात समोर आले आहे.
वारंवार पाठपुरावा करून आणि प्रशासनाकडे दाद मागूनही न्याय मिळत नसल्याने उद्विग्न झालेल्या भाग्यश्री धायगुडे यांनी 27 जुलै रोजी पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत अचानक प्रवेश केला. त्यांनी सोबत आणलेले पेट्रोल अंगावर ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेमुळे सभागृहात एकच खळबळ आणि गोंधळ उडाला. मात्र, तिथे उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान राखत तरुणीला तात्काळ रोखल्याने मोठा अनर्थ टळला. यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
पीडित तरुणीने प्रसारमाध्यमांशी बोलताना मंगेश जगताप यांच्या कुटुंबावर आणि मित्रांवरही गंभीर आरोप केले आहेत. "या संपूर्ण प्रकरणात मंगेश यांचे कुटुंब, त्यांची पोलीस असलेली मेव्हणी आणि दोन मित्र (अमर जगताप व रणजीत तांबडे) सामील आहेत. आमचे लग्न ठरले होते, महाबळेश्वरमध्ये रिसॉर्ट बुकिंग झाले होते आणि 29-30 तारीखही ठरली होती; याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. गेले तीन महिने मंगेश मला दिसला की पळून जातोय. त्याने 21 वर्षे माझ्या आयुष्याशी खेळ का केला?," असा सवाल पीडितेने उपस्थित केला होता.
या धक्कादायक प्रकरणानंतर पुण्याच्या बंड गार्डन पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून घेतला. घटनेचे मुख्य ठिकाण आणि कार्यक्षेत्र लक्षात घेऊन हा गुन्हा बारामतीतील माळेगाव पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. सध्या माळेगाव पोलिसांकडून (Malegaon Police) मंगेश जगताप यांचा शोध सुरू आहे. या आरोपांबाबत मंगेश जगताप यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नसून, पोलिसांच्या सखोल तपासानंतरच या प्रकरणातील सर्व सत्य बाहेर येईल.
आणखी वाचा