राज्याच्या विविध भागात पावसाला सुरुवात झाली आहे, राजधानी मुंबई आणि उपनगरात पावसाच्या सरी कोसळत आहेत. अशातच आता पुढील काही दिवस मुंबई आणि आसपासच्या भागात मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. उद्या मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यातील ठाणे, पालघर आणि रायगडला आँरेज अलर्ट तर मुंबईला उद्या यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच समुद्र किनारी 50 ते 60 किलोमीटर प्रति वेगाने वारे वाहण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.
पुढील 4 दिवस कशी असेल पावसाची स्थितीमुंबई शहरात 30 जुलै रोजी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची आणि ताशी 50-60 किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. 31 जुलै रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची आणि ताशी 50-60 किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. तर 1 ऑगस्ट रोजी मध्यम पाऊस आणि 2 आणि 3 ऑगस्ट रोजी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
ठाणेठाणे जिल्ह्यात 30 जुलै रोजी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस आणि ताशी 50-60 किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. 31 जुलै रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता असून वाऱ्याचा वेग ताशी 70 किमी पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. ठाण्यात 1 ऑगस्ट रोजी मध्यम पाऊस तर 2 आणि 3 ऑगस्ट रोजी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पालघरपालघर जिल्ह्यात 30 जुलै रोजी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40-50 किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. 31 जुलै रोजी काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस आणि ताशी 50-60 किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. 1 ऑगस्ट रोजी मध्यम पाऊस तर 2 आणि 3 ऑगस्ट रोजी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
रायगडरायगड जिल्ह्यात 30 जुलै रोजी अनेक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची आणि ताशी 50-60 किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. 31 जुलै रोजी काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस आणि ताशी 70 किमीपर्यंत सोसाट्याचा वारा वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर 1 ऑगस्ट रोजी मध्यम पाऊस तर 2 ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच 3 ऑगस्ट रोजी मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
नागरिकांना इशाराभारतीय हवामान विभागाच्या (IMD) मते, पुढील पाच दिवस चारही जिल्ह्यांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने लोकांना खराब हवामानात सतर्क राहण्याचा आणि समुद्रकिनारे, पाणी साचलेली ठिकाणे व मोकळ्या जागांवर अनावश्यक हालचाल टाळण्याचा सल्ला दिला आहे.