एनटीएची सर्वात मोठी कारवाई, पेपर तयार करणाऱ्या 600 तज्ज्ञांची उचलबांगडी
एबीपी माझा वेब टीम August 19, 2026 10:43 AM

NTA : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency) संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवण्यासाठी NTA ने मोठी कारवाई केली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) आपल्या परीक्षा विभागाची पुनर्रचना केली असून, यात 600 तज्ज्ञांना हटवून नवीन तज्ज्ञांची नियुक्ती केल्याची माहिती आहे. दरम्यान, एनटीचे (NTA) नवीन कार्यालय मिंटो रोड येथे असेल, अशी देखील माहिती आहे. तर, केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी (Education Minister Pralhad Joshi) यांनी मंगळवारी (18 ऑगस्ट) एनटीए सोबत बैठक घेतली आणि परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी सर्व आवश्यक सुरक्षा आणि संबंधित पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. शिक्षण मंत्र्यांच्या निर्देशांनुसार, एनटीएच्या महासंचालकांनीही एनटीएने केलेल्या कार्यवाहीचा तपशील दिला, अशी देखील माहिती आहे.

National Testing Agency: 600 तज्ञांच्या जागी नवीन तज्ञांची नियुक्ती करून परीक्षा पथकाची पुनर्रचना

एनटीएने सांगितले की, 600 तज्ञांच्या जागी नवीन तज्ञांची नियुक्ती करून परीक्षा पथकाची पुनर्रचना करण्यात आली आहे. प्रश्नपत्रिकांची छाननी अधिक मजबूत करण्यासाठी चार-स्तरीय प्रश्नपत्रिका तपासणी प्रणाली लागू केली जाईल. पुढील दोन ते तीन आठवड्यांत 20-25 अधिकाऱ्यांची भरती केली जाईल. भविष्यातील भरती योजनेचाही आढावा घेण्यात आला. याव्यतिरिक्त, एनटीएची कार्यालये युद्धपातळीवर नवीन ठिकाणी स्थलांतरित केली जातील, जिथे सीआयएसएफ पथकांद्वारे सुरक्षा अधिक मजबूत केली जाईल. असे देखील त्यांनी यावेळी सांगितलं.

NTA: एनटीएच्या कामकाजाचा आढावा, 17 ऑगस्ट रोजीही उच्चस्तरीय बैठक

यापूर्वी सोमवारी (17 ऑगस्ट) प्रल्हाद जोशी यांनी एनटीएच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक घेतली होती. त्यांनी सर्व परीक्षा प्रक्रियांचे सर्वसमावेशक ऑडिट करण्याचे निर्देश दिले. त्यांनी सांगितले की, एजन्सीला परीक्षा प्रणालीच्या प्रत्येक टप्प्याचा आढावा घेणे, त्यातील त्रुटी ओळखणे आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी उचललेल्या पावलांवर एक अहवाल तयार करणे आवश्यक आहे. या बैठकीला उच्च शिक्षण विभागाचे सचिव, एनटीएचे महासंचालक आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

NTA: 10 नवीन व्यावसायिक पदांसाठी अधिसूचना जारी

सोमवारी झालेल्या बैठकीत, एनटीएने 50 हून अधिक कर्मचारी हटवण्याची घोषणाही केली. 10 नवीन व्यावसायिक पदांसाठी अधिसूचना जारी करण्यात आल्या असून, भरती प्रक्रिया सुरू आहे. याव्यतिरिक्त, सायबर सुरक्षा, सायकोमेट्रिक्स, प्रश्नपत्रिकेची रचना आणि इतर विशेष क्षेत्रांसाठी खाजगी क्षेत्रातील तज्ज्ञांना आणले जात आहे.

प्रश्नपत्रिकांमध्ये विसंगती आढळल्याने इंग्रजी, समाजशास्त्र आणि वाणिज्य विषयांची यूजीसी नेट परीक्षा पुन्हा घेतली जाईल, अशी घोषणा एजन्सीने रविवारी (16 ऑगस्ट) केल्यानंतर एनटीएने हे पाऊल उचलले आहे. यामुळे स्पर्धा परीक्षांच्या आयोजनाबाबत या परीक्षा संस्थेवरील टीकेला आणखी खतपाणी मिळाले. अशी देखील शक्यता आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.