Study Space Ideas: मुलांच्या अभ्यासाची रूम कशी असावी?
Marathi August 19, 2026 08:25 PM

मुलं अभ्यासाला बसतात, पण काही मिनिटांतच त्यांचं लक्ष मोबाईल, टीव्ही किंवा आजूबाजूच्या वस्तूंकडे जातं. अनेकदा यासाठी मुलांना दोष देण्यापेक्षा त्यांची अभ्यासाची जागा कशी आहे, हे पाहणं महत्त्वाचं ठरतं. कारण मुलांचं लक्ष विचलित होण्यासाठी वेळ लागत नाही म्हणून शांत, पुरेसा प्रकाश असलेली आणि व्यवस्थित मांडलेली जागा मुलांना अभ्यासासाठी अधिक आरामदायक वाटू शकते.  Study Space For Children

1) अभ्यासासाठी जागा
दररोज वेगवेगळ्या ठिकाणी अभ्यास करण्यापेक्षा शक्य असल्यास मुलासाठी एक ठरावीक कोपरा ठेवा. त्यामुळे अभ्यासाची मानसिक तयारी होण्यास मदत होते.

2) योग्य टेबल, खुर्ची
टेबलची उंची मुलांच्या आकाराला योग्य असावी. खुर्चीत बसल्यावर पायांना आधार मिळणं आणि पाठ स्थिर राहणं महत्त्वाचं आहे. सतत वाकून अभ्यास करण्याची सवय लागू नये याची काळजी घ्यावी.

3) पात्र प्रकाश
अभ्यासाच्या टेबलावर पुरेसा प्रकाश असावा. शक्य असल्यास दिवसा नैसर्गिक प्रकाशाचा वापर करा. रात्री अभ्यास करताना टेबल लॅम्पसोबत खोलीतही पुरेसा प्रकाश ठेवा.

4) गरजेच्या वस्तू
पुस्तकं, वही, पेन आणि आवश्यक शैक्षणिक साहित्य एवढंच टेबलवर ठेवलं तर पसारा कमी राहतो. खेळणी आणि अनावश्यक वस्तू दूर ठेवा. यामुळे अभ्यासामधून लक्ष विचलित होणार नाही

5) मोबाईल टीव्हीपासून दूर
अभ्यासाच्या जागेवर टीव्ही किंवा सतत लक्ष विचलित करणारी उपकरणं नसणं चांगलं. ऑनलाइन अभ्यासासाठी स्क्रीन आवश्यक असल्यास ती योग्य अंतरावर आणि पालकांच्या मार्गदर्शनाखाली वापरू द्या.

6) जागा निवडण्यास मुलांचा सहभाग
अभ्यासाचा कोपरा सजवताना मुलाला त्याची आवड विचारली तर त्या जागेशी त्याचा भावनिक संबंध तयार होऊ शकतो. मात्र सजावट इतकी आकर्षक नसावी की अभ्यासापेक्षा त्याच गोष्टींकडे लक्ष जाईल.

घरात उपलब्ध असलेल्या जागेचा मुलाच्या गरजेनुसार शांत आणि आरामदायी पद्धतीने वापर केला तरी पुरेसं आहे. म्हणूनच, योग्य जागेची निवड आणि ठेवणं चांगली असली की मुलं आपसूकच एकाग्रतेने अभ्यास करतील.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.