सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 
गणेश लटके August 19, 2026 09:43 PM

Sugar Prices News : सध्या सणासुदीच्या काळाला सुरुवात झाली आहे. या काळातच ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. कारण साखरेच्या दरात (Sugar Prices ) मोठी वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात मिठाईची खरेदी विक्री होत असते. मात्र, साखरेच्या वाढत्या दरामुळं मिठाईच्या किंमतीमध्ये (Sweets Price)  देखील वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या 18 दिवसात साखरेच्या दरात तब्बल 18 रुपयांची वाढ झाली आहे. 

Sugar Prices : साखरेचा भाव 61 रुपये प्रति किलोवर पोहोचला

मध्य प्रदेशात साखरेच्या दरात (Sugar Prices ) मोठी वाढ होत आहे. गेल्या अवघ्या 18 दिवसांत साखरेचा भाव जवळपास 18 रुपये प्रति किलोने वाढला आहे. भोपाळच्या घाऊक बाजारात आता साखरेचा भाव 61 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. व्यापाऱ्यांच्या मते, साखरेच्या दरात इतकी मोठी वाढ यापूर्वी कधीही झालेली नाही.

साखरेच्या दरात एवढी वाढ का होतेय ?

दरम्यान, साखरेच्या दरात नेमकी एवढी वाढ का होत आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर व्यापाऱ्यांच्या मते, साखरेच्या वाढत्या किमतींचे एक प्रमुख कारण म्हणजे सरकारचे साठा धोरण. केंद्र सरकारने सध्या साखरेच्या साठ्यावर खूप मोठी मर्यादा घातली आहे. व्यापाऱ्यांचा विश्वास आहे की, जर ही साठा मर्यादा कमी केली, तर बाजारात उपलब्धता वाढू शकते आणि किमती काही प्रमाणात नियंत्रणात ठेवता येऊ शकतात अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. 

मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी, इथेनॉल उत्पादनाचाही परिणाम 

दरम्यान, देशातील अनेक साखर कारखान्यांनी इथेनॉलचे उत्पादन वाढवण्यावर भर दिला आहे. इथेनॉल उत्पादनासाठी उसाचा वाढता वापर हे आणखी एक साखरेच्या दरवाढीचे प्रमुख कारण असल्याचे म्हटले जाते. साखरेऐवजी इथेनॉल उत्पादनासाठी उसाचा काही भाग वापरला जात असल्याने साखर उत्पादनावर परिणाम झाला आहे. बाजारातील मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्याने त्याचा थेट परिणाम किमतींवर होत असल्याची माहिती अभ्यासकांनी दिली आहे. 

साखरेच्या किमती आणखी वाढ होणार का?

सणासुदीचा हंगाम सुरु होणार आहे. अशा परिस्थितीत, साखरेच्या वाढत्या किमतींचा परिणाम मिठाई आणि इतर खाद्यपदार्थांवरही होऊ शकतो. व्यापाऱ्यांच्या मते, जर ही दरवाढ अशीच सुरु राहिली, तर येत्या काही दिवसांत साखर आणखी महाग होऊ शकते. याचा अर्थ असा की, सणासुदीच्या काळात मिठाई खरेदी करण्यासाठी सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागू शकते. 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.