Pratap Sarnaik Statement On Marathi : महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल, पैसे कमवायचे असतील, तर मराठी संस्कृतीचा आणि अभिजात भाषेचा मान-सन्मान ठेवावाच लागेल, असा थेट आणि कडक इशारा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. 1989 च्या महाराष्ट्र मोटार वाहन नियमांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी सर्व परप्रांतीय व स्थानिक वाहनचालकांना केले आहे. तसेच ज्यांना मराठी येणार नाही त्यांच्यावर 20 ऑगस्टपासून कारवाई सुरू होणार असल्याची माहितीही सरनाईकांनी दिली.
महाराष्ट्र दिन ते स्वातंत्र्य दिन या 105 दिवसांच्या कालावधीत कोकण साहित्य परिषद आणि कोकण साहित्य ग्रंथालयाच्या माध्यमातून परप्रांतीय रिक्षाचालकांना मराठी शिकवण्याची विशेष मोहीम राबवण्यात आली होती. ती यापुढेही सुरू ठेवणार असल्याचं प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं.
परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मोहिमेअंतर्गत सुमारे 1 लाख 65 हजार 600 रिक्षा व टॅक्सी चालकांनी मराठी भाषेचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. हा उपक्रम पुढेही 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे' यांच्या नावाने सातत्याने सुरू ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. ज्या चालकांना अजूनही मराठी शिकायचे आहे, त्यांच्यासाठी ही सोय उपलब्ध असणार आहे.
परिवहन विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार गुरुवारपासून (20 ऑगस्ट) ज्या रिक्षा किंवा टॅक्सी चालकाला मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान नसेल किंवा मराठी बोलता येत नसेल, त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
सरनाईक यांनी स्पष्ट केले की, "कोणाचीही रोजीरोटी हिसकावून घेणे हा आमचा किंवा आमच्या शिवसैनिकांचा उद्देश नाही. विविध राज्यांतून आलेल्या लोकांचे आम्ही स्वागतच करतो, त्यांनी इथे यावे आणि व्यवसाय करावा, परंतु महाराष्ट्रात राहताना मराठी भाषेचा मान-सन्मान राखणे बंधनकारक आहे."
प्रत्येक वाहनचालकाला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. मराठी न येणाऱ्या चालकांना प्रथम नोटीस बजावली जाईल आणि तरीही सुधारणा न झाल्यास त्यांच्यावर नियमानुसार कडक कारवाई केली जाईल, असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं.
ही बातमी वाचा: