IND Vs SL 2nd Test – दुखापतीतून सावरत ऋषभ पंतची धडाकेबाज फलंदाजी, महेंद्र सिंग धोनीचा विक्रम मोडला
Marathi August 24, 2026 10:25 PM

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कोलंबो कसोटीमध्ये सामन्याच्या पहिल्या दिवशी ऋषभ पंत दुखापतीमुळे अवघ्या 3 धावांवर सामन्यातून बाहेर पडला होता. त्यानंतर तो दिवसाचा खेळ संपेपर्यंत मैदानात परतला नाही. मात्र, दुसऱ्या दिवशी त्याने दमदार कमबॅक करत अर्धशतक झळकावलं. त्याने 89 चेंडूंचा सामना केला आणि 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 63 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. या खेळीसह त्याने टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीचा विक्रम मोडित काढला आहे.

परदेशी कसोटी सामन्यांमध्ये हिंदुस्थानसाठी यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून पंत आता प्रथम क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने आतापर्यंत कसोटीत 2,501 धावा केल्या असून, धोनीच्या 2,496 धावांच्या विक्रमाला मागे टाकले आहे. पंतने ध्रुव जुरेलसोबत केलेल्या भागीदारीमुळे टीम इंडियाने 503 धावांपर्यंत मजल मारली.

दरम्यान, टीम इंडियाने आपला पहिला डाव 503 धावांवर घोषित केला. पहिल्या डावात देवदत्त पडिक्कलने सर्वाधिक 117 धावा केल्या तर, ध्रुव जुरेलने नाबाद 115 धावा केल्या. या दोघांना शुभमन गिल (50), ऋषभ पंत (63) आणि रविंद्र जडेजा (43) मोलाची साथ दिली. टीम इंडियाने उभारलेला डोंगर भेदण्यासाठी उतरलेल्या श्रीलंकेचा सुरुवात मात्र खराब झाली असून त्यांना अवघ्या 8 या धावसंख्येवर दोन हादरे बसले आहेत. प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुथार यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. सलामीवीर लाहिरू उदारा अवघ्या 1 या धावसंख्येवर तर प्रभात जयसूर्या 2 या धावसंख्येवर बाद झाला. दिवसाअखेर श्रीलंकेने 2 गड्यांच्या मोबदल्यात 8 धावा केल्या आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.