IND Vs SL 2nd Test – माझे आजोबा शेतकरी आणि वडील सैनिक… शतकानंतरच्या अनोख्या सेलिब्रेशनवर ध्रुव जुरेल स्पष्टच बोलला
Marathi August 24, 2026 11:25 PM

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कोलंबो कसोटीमध्ये ध्रुव जुरेलने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी नेत्रदिपक कामगिरी केली. संयमी खेळाच प्रदर्शन करत त्याने शतक ठोकत संघासाठी महत्तवपूर्ण अशी नाबाद 115 धावांची खेळी केली. परिणामी संघाने 503 धावांचा डोंगर श्रीलंकेसमोर उभा केला. दरम्यान, दुसऱ्या दिवसावर छाप पाडली ती ध्रुव जुरेलच्या अनोख्या सेलिब्रेशनने. शतक पूर्ण केल्यानंतर ध्रुव जुरेलने आपल्या हातावर असलेला ‘जय जवान जय किसान’ हा टॅटू ड्रेसिंग रूमच्या दिशेने दाखवत अनोख्या अंदाजात आनंद साजरा केला, ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकार परिषदेत त्याने यावर भाष्य केलं.

सामन्यानंतर आपल्या या खास सेलिब्रेशनमागचे राज उघड करताना ध्रुव जुरेल म्हणाला, “कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे माझ्यासाठी हे अत्यंत भावनिक क्षण होते. माझे आजोबा शेतकरी होते आणि माझे वडील सैनिक होते. मी माझ्या मुळांना कधीही विसरू इच्छित नाही आणि हे सेलिब्रेशन पूर्णपणे माझ्या आजोबा आणि वडिलांसाठीच होते.” विशेष म्हणजे, जुरेलचे वडील नेमचंद जुरेल यांनी 1991 च्या कारगिल युद्धात हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले होते. जुरेलच्या या दमदार शतकी खेळीमुळे हिंदुस्थानची धावसंख्या 500 च्या पार पोहोचली, त्यानंतर कर्णधार शुभमन गिलने डाव घोषित केला. हिंदुस्थानने श्रीलंकाई डावावर दबाव आणण्याची तयारी केली होती, परंतु खराब प्रकाश आणि पावसामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ केवळ तीन षटकांतच संपवावा लागला. दिवसा अखेर श्रीलंकेने दोन फलंदाजाच्या मोबदल्यात 8 धावा केल्या आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.