सरकारकडं तब्बल 86 हजार कोटी अडकले, शासकीय कंत्राटदार घेणार राज ठाकरेंची भेट, आंदोलन तीव्र करणार
वेदांत नेब August 25, 2026 01:13 AM

मुंबई : शासकीय कंत्राटदार ( Government contractors) उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची सकाळी 11 वाजता शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेणार आहेत. कंत्राटदारांचे 86 हजार कोटी अजूनही सरकारकडून मिळालेले नाहीत. त्यामुळं ही थकबाकी मिळावी यासाठी कंत्राटदार मागील अनेक दिवसांपासून ठीक ठिकाणी आंदोलन करत आहेत. कंत्राटदारांच्या आंदोलनाची कुठलीही दखल सरकारकडून घेतली जात नसल्याने उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट कंत्राटदार संघटनेचे पदाधिकारी घेणार आहेत. 

कंत्राटदार टप्प्याटप्प्याने आपला आंदोलन तीव्र करणार

राज ठाकरे यांनी कंत्राटदारांच्या प्रश्नसंदर्भात याआधी सुद्धा प्राथमिक चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे. राज ठाकरे कंत्राटदारांच्या प्रश्नांसंदर्भात त्यांच्या मागण्यासंदर्भात सरकारची चर्चा करून मध्यस्थी करतील आणि कंत्राटदारांचा प्रश्न सोडवतील अशी आशा कंत्राटदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आहे. हे सर्व कंत्राटदार टप्प्याटप्प्याने आपला आंदोलन तीव्र करणार आहेत. त्यामुळे मनसेचा सुद्धा या कंत्राटदारांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळावा या दृष्टीने सुद्धा राज ठाकरेंची वेळ कंत्राटदार संघटनांनी भेटीसाठी मागितली आहे.

शासकीय कंत्राटदारांच्या नेमक्या काय आहेत मागण्या?

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून शासकीय कंत्राटदाराचे मोठ्या प्रमाणात पैसे सरकारकडे अडकले आहेत. वारंवार याबाबत मागणी केली जात आहे. अनेक ठिकाणी शासकीय कंत्राटदारांनी आंदोलने देखील केली आहे. सरकारने 15 ऑगस्ट 2026 पर्यंत प्रलंबित असलेली सर्व पात्र बिले तातडीने अदा करावीत, अशी प्रमुख मागणी कंत्राटदारांची आहे. सरकारने प्रत्येक विभागाचा प्रलंबित बिलांचा विभागनिहाय आढावा घ्यावा. त्यानंतर निश्चित कालमर्यादेत बील अदा करण्याविषयी वेळापत्रक जाहीर करावेत. रखडलेल्या बिलांसाठी आवश्यक निधीची तातडीने तरतूद करावीत. त्याचबरोबर मुख्यमंत्री, वित्त मंत्री, संबंधित सर्व विभागांचे मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य शासकीय कंत्राटदार फेडरेशनच्या प्रतिनिधी मंडळाची संयुक्त बैठक तातडीने आयोजित करण्यात यावी, अशा कंत्राटदारांच्या मागण्या आहेत.

दरम्यान, सरकारनं प्रत्येक विभागाच्या प्रलंबित बिलांबाबत चर्चा करावी अशी मागणी देखील शासकीय कंत्राटदारांनी केली आहे. त्यानंतर यातील प्रत्यक्ष अडचणी दूर कराव्यात. भविष्यात शासकीय कंत्राटदारांची बिले दीर्घकाळ प्रलंबित राहणार नाही, यासाठी कायमस्वरुपी आर्थिक व्यवस्था निर्माण करावी, अशीही त्यांची मागणी आहे. आता शासकीय कंत्राटदारांच्या मागण्याकडे सरकार कसे पाहते हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे. मात्र, त्यापूर्वी उद्या राज ठाकरे यांच्यासोबत होण्या बैठकीत नेमकी काय चर्चा होणार याकडं देखील सर्वाचं लक्ष लागलं आहे. राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं देखील महत्वाटं ठरणार आहे. 

 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.