तळकोकणात पावसाची संततधार; राज्यातील 'या' जिल्ह्यांत मेघगर्जनेचा इशारा; तर धाराशिवमध्ये अवघा 8 टक्के पाणीसाठा शिल्लक; 103 गावांमध्ये पाणीटंचाईची झळ
एबीपी माझा वेब टीम August 26, 2026 01:13 PM

Maharashtra Rain Alert: सध्या राज्यातील पावसाची (Rain) परिस्थिती चिंताजनक असल्याची स्थिती आहे. राज्याच्या अनेक भागात पावसानं दडी मारल्याची स्थिती आहे. त्यामुळं राज्यातील शेतकऱ्यांची (Farmers) चिंता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशातच मराठवाड्यातील धाराशिवमध्ये फक्त आठ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती आहे. तर ऑगस्ट संपत आला तरी म्हणावा असा पाऊस पडला नसल्याने आगामी काळात दुष्काळा सावट चिंतेचं कारण ठरतं आहे. तर दुसरीकडे हवामान विभागाकडून आज (26 ऑगस्ट) महाराष्ट्रातील बहुतांश भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी सरीही होऊ शकतात. तर तिकडे तळकोकणात पावसाची संततधार सुरु असून रायगड जिल्ह्याच्या दक्षिण भागातही पावसाने हजेरी लावली आहे. असे असलं तरी आज राज्यात सर्वदूर जोरदार पावसाची शक्यता कमी असल्याची शक्यता आहे. तर जळगाव, नाशिक, नाशिक घाटमाथा आणि पुणे घाटमाथा या चार भागांना हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. (Maharashtra Rain News)

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूरमध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील हवामानात काहीसा बदल होण्याची शक्यता आहे. जळगाव, नाशिक आणि नाशिक घाटमाथा परिसरासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागांत मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे. तर नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यातील काही ठिकाणी अतिशय हलका ते हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Sindhudurg Rain  : तळकोकणात पावसाची संततधार

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून जिल्ह्यातील सर्वच भागात पाऊस कोसळत आहे. गेले काही दिवस पावसाने दडी मारली होती, त्यामुळे बळीराजा चिंतेत होता. मात्र पावसाची संततधार सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. शेतीसाठी उपयुक्त असा पाऊस कोसळत असल्याने बळीराजा सुखावला असला तरी देखील अल निनोचा प्रभाव असल्याने शेतकऱ्याच्या मनात धाकधूक आहे. यावर्षी गेल्या वर्षाच्या तुलनेत 25 टक्के सिंधुदुर्ग जिल्ह्यात तूट आहे. त्यामुळे अल निनोचा प्रभाव आहे. मात्र जिल्ह्यात सिंचनासाठी आणि विनायुक्त पाण्याचा 87 टक्के पाणीसाठा झाला आहे. तर तिलारी धरण 90 टक्के भरलं आहे.

Raigad Rain: रायगडच्या दक्षिण भागात पावसाची रिमझिम

रायगडच्या दक्षिण भागातील महाड, पोलादपूर, म्हसळा, श्रीवर्धन, माणगाव परिसरात पावसाच्या रिमझिम सरी कोसळत असून मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. त्यामुळे बळीराजा काहीसा सुखावला आहे.

Bhandara Rain News : ढगाळी वातावरणाचा परिणाम, धान पिकांवर खोडकिडीचा प्रादुर्भाव

भंडारा हा भातपीक उत्पादक जिल्हा आहे. खरीप हंगामाच्या भात पिकाच्या लागवडीचं कामं जवळपास पूर्णत्वास आलं असून आवत्या धानाची पेरणीही आटोपली आहे. मात्र, बदलते हवामान आणि सातत्यानं राहणाऱ्या ढगाळ वातावरणाचा परिणाम धान पिकावर दिसून येत आहे. जिल्ह्यातील अनेक भागातील विविध भागात धान पिकांवर खोडकिडीबरोबरच करपा, कडीकरपा आणि अळींचा प्रादुर्भाव झाल्याचं निदर्शनास येत असल्यानं धान उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे. यंदाच्या हंगामात सुरुवातीला पेरणीच्या नियोजनापासून ते रोवणीपर्यंत शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागला. रोवणी पूर्ण झाल्यानंतर आता धान पिकावर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव वाढल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

Dharashiv : धाराशिवमध्ये फक्त आठ टक्के पाणीसाठा शिल्लक; जिल्हाभरातील 103 गावांमध्ये पाणीटंचाईच्या झळा

धाराशिव जिल्ह्यात फक्त आठ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिले आहे. ऑगस्ट संपत आला तरी अध्याप म्हणावा असा पाऊस नाही त्यामुळे जिल्हाभरातील 225 प्रकल्पामध्ये पाणी पातळी कमालीची घटली आहे. त्यामुळे सर्व पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. ऑगस्टमध्ये 103 गावांमध्ये पाणीटंचाईचा जळा आहेत. दुष्काळाच सावट गडद होत असताना आता फक्त परतीच्या पावसावर नजरा लागल्या आहेत. जर परतीच्या पावसाने हुलकावणी दिली तर महाभयंकर दुष्काळाला सामना धाराशिवकरांना करावा लागू शकतो. सध्या विहिरीत पाणी पातळी वाढलेली नाहीये तुरळक पावसावर कशी बशी पीक आहेत ते देखील पावसाची ओढ पडत असल्याने माना टाकत आहेत. धाराशिवलगतच्या हातलाई तलावात पाणी पातळी कमालीची घटली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.