… आणि धर्मवीर ठाणे महापालिकेत पुन्हा आले, तीच आरमाडा, तोच चालक, तोच रुबाब; २५ वर्षांनंतर दिघे यांची गाडी मुख्यालयात
Marathi August 26, 2026 01:25 PM

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

२५ वर्षांनंतर जुनी आरमाडा गाडी मोठ्या रुबाबात ठाणे महापालिकेच्या मुख्यालयात आज आली आणि जणू भूतकाळच अवतरला. ही गाडी होती तमाम ठाणेकरांचे लाडके धर्मवीर आनंद दिघे यांची. निमित्त होते त्यांच्या जीवनावरील प्रदर्शनाचे. उपस्थितांना मोठे आकर्षण होते. पालिकेतील कर्मचारी, अधिकारी आणि कामानिमित्त आलेल्या शिवसैनिकांच्या तोंडून एकच उद्‌गार निघाले, अरे… आपले दिघेसाहेब आले. तीच आरमाडा, तोच चालक आणि तीच शान बघून सर्वजण धर्मवीरांच्या आठवणीने भावूक झाले. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांची उद्या बुधवारी २५वी पुण्यतिथी. त्याचे औचित्य साधून काही संस्थांनी ठाणे महापालिकेच्या आवारात त्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आज भरवले होते. ते पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली. मुख्यालयाच्या आवारातील दिघे साहेबांची लाडकी महाराष्ट्र ०५ जी २०१३ या क्रमांकाची आरमाडा गाडीदेखील मुख्य आकर्षण होते. गेली अनेक वर्षे ज्या गिरीश शिलोगी यांनी धर्मवीरांच्या या गाडीचे चालक म्हणून काम केले तेदेखील यावेळी उपस्थित होते. दिघे यांचे निधन झाले त्याच्या आदल्या दिवशी ते स्वतः याच आरमाडातून पालिकेत आले होते. आज ती गाडी होती. चालकही होते, पण आनंद दिघे मात्र नव्हते.

आडवाणी यांनीही केला होता प्रवास
या गाडीतून भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांनीही प्रवास केला होता. सध्या या दुरुस्त केलेल्या आरमाडामध्ये आनंद दिघे वापरत असलेला कंगवा आणि वृत्तपत्र, सिगारेट, चपला या ठेवण्यात आल्या आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.