वसई-विरार महापालिकेत ९५७कोटींचा कचरा टेंडर घोटाळा; शिवसेनेचा आरोप प्रक्रिया रद्द करून तत्काळ चौकशी करा
Marathi August 26, 2026 01:25 PM

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

वसई-विरार शहरात रोजचा घनकचरा संकलन आणि रस्ते सफाईच्या कामासाठी काढण्यात आलेली ९५७ कोटी रुपयांची निविदा अत्यंत संशयास्पद आणि विशिष्ट कंत्राटदारांच्या फायद्यासाठी असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केला आहे. याबाबत शिवसेनेने आयुक्त पृथ्वीराज बी. पी., महापौर अजीव पाटील यांना पत्र दिले असून उपमहापौर मार्शल लोपीस आणि विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांची भेट घेऊन ही निविदा तातडीने रद्द करावी आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, अशी आक्रमक मागणी केली आहे.

जिल्हाप्रमुख प्रथमेश राऊत यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महापालिका प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून या कचरा टेंडरच्या संशयास्पद कारभाराची पोलखोल केली आहे. यापूर्वी घनकचरा संकल नाची दोन वेळा रद्द झालेली निविदा तिसऱ्यांदा प्रशासकीय राजवटीचा गैरफायदा घेत अत्यंत घाईघाईने मंजूर करण्यात आली, असा आरोप शिवसेनेने केला आहे. अधिकृत नोंदींनुसार २५ सप्टेंबर २०२५ रोजी प्रशासकीय मान्यता

मिळाल्यानंतर अवघ्या एका दिवसात निविदा प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर डिसेंबर महिन्यात तांत्रिक सल्लागाराचा अहवाल मिळताच वाटाघाटी, कंत्राटदारांचे उत्तर आणि प्रशासकीय मंजुरी ही सर्व प्रक्रिया केवळ दोन-तीन दिवसांत उरकण्यात आली. १५ डिसेंबर २०२५ रोजी निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी काही तास आधी कंत्राटदारांना घाईघाईने स्वीकृतीपत्र देण्यात आल्याने या संपूर्ण प्रक्रियेवर दाट संशय निर्माण झाला आहे.

महापालिकेवर धडक मोर्चा काढणार
आता या ९५७ कोटींच्या संशयास्पद निविदेची आणि कर्मचाऱ्यांच्या कपातीची सखोल चौकशी करून विद्यमान कंत्राट रद्द करावे आणि आगामी महासभेत नवीन प्रस्ताव आणून पारदर्शक निविदा प्रक्रिया राबवावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. प्रशासनाने या मागणीची त्वरित दखल न घेतल्यास महापालिकेवर धडक मोर्चा काढण्याचा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख प्रथमेश राऊत यांनी दिला आहे.

कंत्राटदाराकडून फसवणूक, मनुष्यबळ आणि वाहनात कपात
कंत्राटदारांकडून महापालिका आणि नागरिकांची मोठी फसवणूक सुरू आहे. महापालिकेच्या ९ प्रभाग समित्या आणि २० विभागांमधील सफाईसाठी किमान १२५७ कामगार आणि कचरा संकलनासाठी १३७९ कामगारांची आवश्यकता आहे. तसेच पालिकेची ६५ कॉम्पॅक्टर आणि १२० टीपर वाहने लागतात. मात्र अधिक नफा कमावण्याच्या हेतूने कंत्राटदारांनी मनुष्यबळ आणि वाहनांच्या संख्येत प्रचंड कपात केली आहे. पुरेशी यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे शहरात दुर्गंधी आणि रोगराई पसरली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.