पालघरमध्ये चार वर्गासाठी एक मास्तर, जिल्ह्यात शिक्षकांची १६०० पदे रिक्त
Marathi August 26, 2026 01:25 PM

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागातील शिक्षणाची परिस्थिती चिंताजनक आहे. आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी १ ऑगस्ट २०१४ ला पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली. मात्र आजही आदिवासी तालुक्यात शिक्षणाची गंगोत्री पोहोचलेली नाही. शिक्षकांची कमतरता या जटील समस्येने पालघर जिल्ह्याला ग्रासले आहे. पालघर जिल्हा परिषद शाळांमधील ६ हजार ४९७ शिक्षक पदांपैकी १ हजार ६१८ पदे रिक्त आहेत. पुरेसे शिक्षक नसल्याने एका शिक्षकाला तीन ते चार वर्ग सांभाळावे लागत आहेत. परिणामी शिक्षणाअभावी आदिवासी विद्यार्थ्यांची परवड होत आहे.

जिल्ह्यातील २ हजार ११० जिल्हा परिषद शाळांपैकी १ हजार ५६६ शाळांमध्ये एक ते दोन शिक्षक कार्यरत आहेत. काही शाळांत तर शिक्षकच नाहीत. अतिदुर्गम मोखाडा, जव्हार आणि विक्रमगड तालुक्यांची स्थिती भयावह आहे. मोखाडा तालुक्यात शिक्षकांची ४६५ मंजूर पदे आहेत. पैकी केवळ ३१५ शिक्षक कार्यरत असून तब्बल १५० पदे रिक्त आहेत. मोहांडा शाळेत १३५ विद्यार्थी असून फक्त ३ शिक्षक आहेत. पिंपळपाडा शाळेत १२५ विद्यार्थी असून पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग आहेत. मात्र शिक्षक अवघे दोन आहेत. यातील एक शिक्षक कंत्राटी असून एका शिक्षकाला चार-चार वर्ग सांभाळावे लागतात. हे आदिवासी तालुक्याचे शैक्षणिक क्षेत्रातील भीषण वास्तव आहे.

पवित्र पोर्टलद्वारे होणार शिक्षक भरती
एका शिक्षकाने चार वर्ग शिकवायचे कसे, मुलांचा शैक्षणिक पाया मजबूत कसा होणार, असा संतप्त सवाल पालकांचा आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांना विचारणा केली असता पवित्र पोर्टलद्वारे लवकरच शिक्षक भरती करण्यात येणार असून तशी जाहिरात दिल्याची त्यांनी माहिती दिली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.