Video: गाभाऱ्यातील प्रवेशावरून वाद घालत भाजप आमदाराच्या लेकीनं कानशिलात लगावली अन् PSI सविता पाटलांनी जागेवर करेक्ट कार्यक्रम केला! व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल
जयदीप मेढे August 26, 2026 01:43 PM

BJP MLA B Suresh Gowda daughter Aishwarya Viral Video: मंड्या जिल्ह्यातील श्रीरंगपट्टण तालुक्यात एका मंदिरात पोलीस उपनिरीक्षक सविता बी. पाटील यांना मारहाण केल्याप्रकरणी भाजप आमदार सुरेश गौडा यांची मुलगी ऐश्वर्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आता आमदाराची मुलगी ऐश्वर्या सविता पाटील यांना कानशिलात मारत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील हा व्हिडिओ व्हायरल झाला असून सविता पाटील यांनी ऐश्वर्यानं कर्तव्यावर असताना मारल्यानंतर तिथंच तिला कानशिलात फटकावल्याचे दिसून येते. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा संपूर्ण प्रकार कैद झाला आहे.

वादाचे रूपांतर हाणामारीत

आमदाराची मुलगी ऐश्वर्याचा मंदिरातील गाभाऱ्यातील प्रवेशावरून पीएसआय सविता पाटील यांच्याशी वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यावर, उपस्थित भाविक आणि उपस्थित पोलिसांनी दोघींना थांबवलं. या वादानंतर श्रीरंगपट्टण येथील क्यथनहळ्ळी पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सविता पाटील यांच्या तक्रारीच्या आधारे ऐश्वर्याच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. प्रत्युत्तरात ऐश्वर्याने तक्रार दाखल केली असली तरी, पोलीस अद्याप तिची तपासणी करत असल्याचे त्यांनी सांगितले.

नेमकी कधी घडली घटना?

ही घटना 12 ऑगस्ट रोजी श्रीरंगपट्टण तालुक्यातील उक्कडा मंदिरात भीमाना अमावस्येच्या विधीदरम्यान घडली. मंदिरात आलेल्या ऐश्वर्याने मंड्या महिला पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या आणि मंदिरातच तैनात असलेल्या सविता पाटील यांनी मंदिरात प्रवेश करण्यास रोखल्याने आक्षेप घेतला. सविता पाटील यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, कर्तव्य बजावत असताना कुमारी ऐश्वर्याने शिवीगाळ केली आणि कानशिलात लगावली. एका पोलीस अधिकाऱ्याशी विवाहबद्ध असलेल्या ऐश्वर्यावर भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.