जालन्यात मध्यरात्री बाहेर चहा पितानाच तरूणाला भोसकलं; नातेवाईक महिलेबद्दल अपशब्द वापरल्यानं घडला प्रकार, पोलिसांची चक्र फिरली अन् पहाटेच...
रवी मुंडे, एबीपी माझा August 26, 2026 02:43 PM

जालना: नातेवाईक महिलेविषयी अपशब्द वापरल्याच्या कारणावरून एका 24 वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना जालना शहराजवळील नागेवाडी येथे मध्यरात्री (Jalna Crime News) घडली. निखिल पवार असे हत्या (Jalna Crime News) झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी चंदनझिरा पोलिसांनी कारवाई करत पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला अवघ्या काही तासांत बेड्या ठोकल्या आहेत.(Jalna Crime News)

Jalna Crime News: चहा पिताना वाद आणि प्राणघातक हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास निखिल पवार हा नागेवाडी परिसरात चहा घेत उभा होता. त्यावेळी आरोपी संतोष लांडे याने निखिलवर आपल्या नातेवाईक महिलेबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप केला. यावरून दोघांमध्ये तीव्र वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर संतापलेल्या संतोषने जवळ असलेल्या चाकूने निखिलवर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेला निखिल रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि उपचारापूर्वीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.(Jalna Crime News)

Jalna Crime News: पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला बेड्या

घटनेची माहिती मिळताच चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत, परिसरातून पळून जाण्याच्या तयारीत असलेला आरोपी संतोष लांडे याला पहाटेच्या सुमारास शिताफीने ताब्यात घेऊन अटक केली.(Jalna Crime News)

Jalna Crime News: चंदनझिरा पोलिसांकडून दुसऱ्या एका बेवारस मृतदेहाच्या हत्येचाही उलगडा

दरम्यान, नागेवाडी रस्त्यावर २४ ऑगस्ट रोजी घडलेल्या दुसऱ्या एका हत्येच्या प्रकरणाचाही चंदनझिरा पोलिसांनी यशस्वी उलगडा केला आहे. पोलीस निरीक्षक किरण बीडवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, "२४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास नागेवाडी रोडवर एका अनोळखी पुरुषाचा अंगावर जखमा असलेला मृतदेह आढळून आला होता. त्यावरून चंदनझिरा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२ व २०१ (हत्या व पुरावा नष्ट करणे) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटवणे हे पोलिसांसमोर मुख्य आव्हान होते. यासाठी विविध व्हॉट्सॲप ग्रुप, आसपासची पोलीस ठाणी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मृतदेहाची माहिती सर्वत्र पाठवण्यात आली. तपासादरम्यान नागेवाडी येथील एक तरुण दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. नातेवाइकांनी पोलीस ठाण्यात येऊन मृतदेहाची ओळख पटवली असता, मृत व्यक्तीचे नाव गजानन भारत तुपे (वय २५ वर्षे, रा. नागेवाडी) असल्याचे निष्पन्न झाले आहे." जालना शहर व नागेवाडी परिसरात एकामागोमाग एक घडलेल्या या हत्यांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून पोलीस दोन्ही प्रकरणांचा पुढील सखोल तपास करत आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.