प्रियकरासोबत फिरण्यासाठी गेली अन् पुढं आक्रित घडलं, अल्पवयीन मुलीचा घरी थेट मृतदेहच परतला; पालघरमध्ये नेमकं काय घडलं?
संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर August 27, 2026 10:43 AM

Palghar Crime News : पालघरमध्ये एक विचित्र घटना घडल्याचे समोर आलं आहे. प्रियकरा सोबत फिरण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा थेट मृतदेहच घरी परतल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. 17 वर्षीय मुलगी मागील आठवड्यात आपल्या प्रियकरासोबत फिरण्यासाठी गेली होती. मात्र दोन दिवसांनी मुलीचा मृत्यू (Crime News) झाल्याचा तिच्या कुटुंबियांना फोन आला असून तिच्या प्रियकराने तिची हत्या (Palghar Crime News) केल्याचा आरोप मृत मुलीच्या कुटुंबीयांकडून केला जातोय. मात्र या मृत्यूमागचं गूढ अद्याप कायम असून पोलीस (Palghar Police) या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे

Palghar Crime News : तात्काळ रुग्णालयात न नेताच प्रार्थना करण्यात वेळ घालवला, कुटुंबीयांचा आरोप

दरम्यान, यासंदर्भात कासा पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद झाली असून सध्या कासा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मात्र या प्रकरणात तरुणीची तिची प्रकृती खालावल्यानंतर रुग्णालयात न नेताच तिच्या शेजारी येशूची प्रार्थना करण्यात वेळ घालवला असल्याचा आरोप देखील यावेळी मृत मुलीच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. तर हा मृत्यू घातपात असून तिच्या प्रियकरासह या सगळ्यात दोषी असलेल्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी तिच्या कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे.

तर या प्रकरणी शवविच्छेदनाचे नमुने तपासणीसाठी पाठवले असून अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमर पाटील यांच्याकडून देण्यात आली आहे.

Buldhana News : सर्पदंश झालेल्या गर्भवतीला झोळीतून नेलं; रुग्णालयांच्या फेऱ्यांत वाटेतच मृत्यू

जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासीबहुल चाळीस टपरी गावातील 22 वर्षीय गर्भवती सादुरी राधेश्याम खरात यांना २५ ऑगस्ट रोजी सर्पदंश झाला. गावाला पक्का रस्ता नसल्याने कुटुंबीयांनी चादर-बांबूच्या झोळीतून त्यांना भिंगारा येथे नेले. त्यानंतर जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशासाठी आवश्यक उपचार यंत्रणा नसल्याने तिला पुढे खामगाव येथील सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आलं. मात्र तोपर्यंत तिची प्रकृती अतिशय गंभीर झाल्याने अकोला येथे उपचारासाठी हलविण्याची धावपळ सुरू झाली. मात्र उपचारासाठी जात असतानाच त्यांचा मृत्यू झाला. गावात रस्ता नसल्याने पावसाळ्यात रुग्णांना झोळीतून नेण्याची वेळ येत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे.

दरम्यान, सर्पदंशावरील तातडीचे उपचार, ऑक्सिजन आणि आपत्कालीन आरोग्य सुविधांबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. या घटनेची जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन चाळीस टपरीला कायमस्वरूपी पक्का रस्ता आणि सक्षम आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी होत आहे. जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी वैयक्तिक लक्ष घालून कालबद्ध निर्णय घ्यावा, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.