Pune Warje Malwadi Crime Case : पुण्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. श्रावण महिना सुरू असताना दारूच्या नशेत घरी येऊन मटण शिजवून देण्याचा हट्ट धरल्याने, झालेल्या वादातून निष्पाप मुलाचा त्याच्याच वडिलांनी बेदम मारहाण करून त्याला संपवलं. वारजे माळवाडी परिसरातील रामनगर भागात 24 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली.
या घटनेत महेश भागवत गायकवाड (वय 30) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी कारवाई करत महेशचे वडील भागवत सूर्यभान गायकवाड (वय 64) आणि आई पार्वती भागवत गायकवाड (वय 60) या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महेशचे 10 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र, त्याला दारूचे गंभीर व्यसन असल्याने आणि तो कोणतीही नोकरी किंवा कामधंदा करत नसल्यामुळे पत्नीने त्याला सोडले होते. काही दिवसांपूर्वीच त्यांचा घटस्फोट झाला होता आणि पत्नी आपल्या दोन मुलांना घेऊन माहेरी निघून गेली होती.
महेश एकटाच राहत होता आणि जेवणासाठी शेजारीच राहणाऱ्या आई-वडिलांकडे जात असे. दारूच्या नशेत घरी आल्यावर तो नेहमी मांसाहारी जेवणाची मागणी करायचा. सध्या श्रावण महिना सुरू असल्यामुळे घरात मांसाहार बनवला जात नव्हता. 24 ऑगस्टच्या रात्री 10.30 वाजता नेहमीप्रमाणे दारू पिऊन आलेल्या महेशने पुन्हा मटण कालवण करून देण्याचा हट्ट धरला. श्रावणात मटण बनवणार नाही असे सांगूनही त्याने भांडण उकरून काढले.
वादाचे रूपांतर भीषण हिंसाचारात झाले. संतापाच्या भरात वडील भागवत गायकवाड यांनी महेशच्या तोंडावर आणि डोक्यावर अत्यंत निर्दयीपणे जबर मारहाण केली. या मारहाणीत महेशचा जागीच दुर्दैवी अंत झाला.
आपला मुलगा मारहाणीत दगावल्याचे स्पष्ट असूनही, आई पार्वतीने पतीला वाचवण्यासाठी ही घटना कोणालाही कळू दिली नाही. एवढेच नव्हे तर तिने घटनास्थळावरील रक्ताचे डाग साफ करून हत्येचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
या संपूर्ण प्रकरणी महेशच्या मोठ्या भावाने (जो पेंटिंगचे काम करतो) वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद नोंदवली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मुलाची हत्या केल्याप्रकरणी बापाला तर हत्येचे पुरावे नष्ट करून सहकार्य केल्याप्रकरणी आईला अटक करण्यात आली असून पोलीस पुढील चौकशी करत आहेत.
ही बातमी वाचा: