गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांना वाहतूक कोंडीचा प्रचंड फटका बसताना दिसत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर शनिवारी प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. कोलाड ते इंदापूर दरम्यान सुमारे 10 किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. हे अंतर पार करण्यासाठी दोन ते तीन तास लागत होते. इंदापूर, माणगाव या पट्ट्यात प्रचंड ट्रॅफिक जॅम पाहायला मिळाले. मुंबईकडून गावी जाण्यासाठी निघालेल्या कोकणवासीयांसाठी ठिकठिकाणी ठेवण्यात आलेले फूड स्टॉल सध्या फायदेकारक ठरत आहेत. वाहतूक कोंडीत तासनतास थांबावं लागत असल्याने अनेक ठिकाणी प्रवाशांची मोठी गैरसोय होते त्यामुळे काही तरुणांकडून असे स्टॉल उभारून प्रवाशांना मोफत चहा, नाश्ता देण्याचे काम सुरू आहे.
मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी कायम आहे. सलग तिसऱ्या दिवशी गणेशभक्तांना वाहतूक कोंडीचा फटका बसताना दिसत आहे. इंदापूरजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत. माणगावमध्ये वाहतूक सुरळीत असली तरी संथगतीने सुरु आहेत. कालच्या तुलनेत आज वाहतूक कोंडी कमी असल्याचे चित्र आहे.