सुरक्षारक्षक भरतीसाठी ५३ उमेदवारांची निवड
esakal September 19, 2024 10:45 PM

सुरक्षारक्षक भरतीसाठी ५३ जणांची निवड

शिवतेज संस्था; पुण्यात २१ दिवसांचे प्रशिक्षण

सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १९ : शिव स्वराज्य सुरक्षा आणि मेन पॉवर या सुरक्षा कंपनीच्या सहकार्यातून खेड शहरातील शिवतेज आरोग्य सेवासंस्थेच्या बहुउद्देशीय सभागृहात आयोजित केलेल्या पाचदिवसीय सुरक्षारक्षक भरती कार्यक्रमात ५३ मुलांची २१ दिवसांच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली.
सुरक्षारक्षक भरती शिबिराचे उद्घाटन शिवसेना शहरप्रमुख कुंदन सातपुते, मिनार चिखले, प्रेमल चिखले आदींच्या उपस्थितीत झाले. आमदार योगेश कदम आणि त्यांच्या पत्नी श्रेया कदम यांची ही संकल्पना आहे. हे शिबिर उद्यापर्यंत (ता. १९) आहे. या वेळी शिव स्वराज सिक्युरिटी अँड मेन पॉवर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतर्फे कार्यक्रम अधिकारी गोरख जगताप व चंद्रशेखर उपस्थित होते. ते म्हणाले, कंपनीमार्फत हा कायमस्वरूपी सुरक्षारक्षक भरती कार्यक्रम राबवण्यात येत आहे. त्यासाठी पात्र युवकाला सुरक्षा सुपरवायझर व सुरक्षारक्षक म्हणून निवडले जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर २२ व्या दिवशी सर्वांना तीन महिन्यांसाठी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये आणि विभागांमध्ये सुरक्षा कर्मचारी पदावर नियुक्ती दिली जाईल. त्यांना पीएफ, पेन्शनसारख्या सर्व सुविधा मिळतील. विधवा निवृत्ती वेतन, ३ लाख रुपयांचा विमा यांसह अनेक सुविधा दिल्या जाणार आहेत. सुरक्षारक्षक म्हणून १५ ते १९ हजार तर सुपरवायझर म्हणून १६ ते २३ हजार रुपये दरमहा वेतन मिळेल. ५३ मुलांची २१ दिवसांच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली. युवकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुंदन सातपुते यांनी केले.
-------

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.