ओवळे-तळेगाव एसटीच्या संख्येत वाढ करावी
esakal September 19, 2024 11:45 PM

सोमाटणे, ता. १९ ः तळेगावला जाण्यासाठी ओवळे-तळेगाव अशी एकच एसटी येथील नागरिकांसाठी आहे. पवनमाळातील पूर्व भागातील पाचाणे, पुसाणे, ओवळे, डोणे, आढले या गावातील विद्यार्थी देखील शिक्षणासाठी ओवळे-तळेगाव या एसटीने प्रवास करतात. मात्र, एकच एसटी असल्याने १३० विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या बसच्या संख्येमध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्याक्ष बाळासाहेब घोटकुले यांनी मावळचे तहसीलदार, शिरगाव पोलिस स्टेशन व तळेगाव आगाराला निवेदनाव्दारे केली आहे.

निवेदनात म्हटले प्रमाणे, तळेगावकडे एकच एसटी बस असल्याने दररोज अनेक विविद्यार्थ्यांना एसटी बसमध्ये बसता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालय बुडवावे लागते. हा प्रकार दररोज घडत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याचा धोका वाढला आहे. प्रवासाच्या त्रासाला कंटाळल्याने अनेकावर शिक्षण सोडून देण्याची वेळही आली असून यामध्ये मुलींच्या शिक्षणाची समस्या अधिकच वाढली आहे. विद्यार्थ्याबरोबर या एकाच एसटी बसमध्ये तळेगावला जाणाऱ्या महिला व ज्येष्ठ नागरिकही असतात. ही समस्या सोडवण्यासाठी तळेगाव आगाराने या मार्गावर एसटी बसच्या फेऱ्या वाढवाव्यात, ओवळे येथे मुक्कामी एसटीबसची सोय करावी, रविवारी आठवडेबाजारामुळे तळेगावला येणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक असल्याने रविवारीही बसची संख्या वाढवावी अशा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.