श्राद्धपक्षातील आरोग्य
esakal September 20, 2024 11:45 AM

- डॉ. मालविका तांबे

श्री गणरायांना निरोप दिल्या दिल्या सुरुवात होते ती श्राद्धपक्षाला. श्राद्धपक्ष किंवा पितृपक्ष हा भाद्रपदाच्या प्रतिपदेला सुरू होतो आणि सर्वपित्री अमावस्येला संपतो. या काळाला आपल्याकडे धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व तर आहेच. पण यात असलेले बरेच नियम आयुर्वेदाला धरूनही असलेले दिसतात.

आयुर्वेदानुसार प्रत्येक ऋतू आपल्या शरीरावर वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम करत असतो. निसर्गात होणाऱ्या बदलांनुसार आपल्या वागणुकीत अर्थात आहार व विहारात आपल्याला बदल करणे अपेक्षित असते. या सगळ्या नियमांना ऋतुचर्या असे म्हटले जाते. श्राद्धपक्षाचा विचार केला तर या वेळी वर्षाऋतूचे शेवटचे काही दिवस असतात तसेच शरद ऋतूची चाहूल लागलेली असते. श्राद्धपक्षात वर्षा ऋतूत असलेला पाऊस व त्यामुळे वातावरणात आलेला दमटपणा तसेच शरदात असलेले मोकळे आकाश व सूर्याची किरणे या दोन्हीमुळे लपंडाव होत असलेला दिसतो.

पावसाळ्यात आजारपण येण्याची शक्यता सगळ्यांत जास्त दिसते. वेगवेगळ्या प्रकारचे जंतुसंसर्गही या काळात आपल्याला बळावलेले दिसतात. या काळात वात व पित्तदोषांचे शमन करणे पण अत्यंत आवश्यक असते.

श्राद्धपक्षात पितरांना भोजन द्यावे असे सांगितलेले आहे. आपल्या शरीराचा विचार केला तर आपली सर्व जीन्स आपल्या पितरांकडून आलेली असतात. तसेच त्यांच्यात जी काही नवीन रचना तयार होत असते ती खाल्लेल्या आहारामुळेच होत असते. अर्थातच या काळात आपण जे काही खाणार आहोत त्याचा कदाचित जास्त प्रमाणात परिणाम आपल्या जनुकांवर पडत असावा.

कुठलाही पूजाविधी म्हटला तर आपल्याकडे सर्व प्रकारचे पावित्र्य पाळले जाते. घराची शुद्धी, विचारांची शुद्धी, अन्नाची शुद्धी, शरीराची शुद्धी, वातावरणाची शुद्धी या सगळ्यांची काळजी या काळात घेतली जाते. शुचिता पाळल्यामुळे होणारे संक्रमण कमी व्हायला कदाचित मदत मिळत असावी.

या काळात दानालाही खूप महत्त्व आहे. त्यातल्या त्यात अन्नदान व वस्त्रदान खूप महत्त्वाचे मानले जाते. काही लोकांना पावसाळ्यात उपजीविका चालवणे कठीण होत असावे त्यामुळे कदाचित ही सामाजिक पद्धत रूढ झाली असावी. विधीमध्ये काळे तीळ, जव, मध, तूप, तांदूळ यांना महत्त्व दिलेले आढळते. आयुर्वेदोक्त आहारात या काळात या सगळ्यांचा समावेश सांगितलेला आहे.

श्राद्धपक्षात केल्या जाणाऱ्या काही विशिष्ट पाककृती आपले आरोग्य जपण्यासाठी मदत करत असाव्या. प्रकृतीला मानवणाऱ्या, ऋतुचर्येच्या नियमांत बसणाऱ्या व शरीराला ताकद व आरोग्य देणाऱ्या कृती या काळात केलेल्या दिसतात. आपण आज श्राद्धपक्षात केल्या जाणाऱ्या दोन पाककृती पाहणार आहोत.

पौष्टिक वडे

श्राद्धाला वडे करण्याची पद्धत आपल्याकडे पूर्वापार चालत आलेली आहे. वड्यांमध्ये तांदूळ हा मुख्य घटक असतो व त्याच्याबरोबरीने अख्खे उडीद, गहू सुद्धा वापरले जातात. यातील तांदूळ वात व पित्तदोषाला संतुलित करतात, तर उडीद शरीरातील वातदोष कमी करून प्राकृत कफ वाढवतात. गहू वात-पित्तदोषांना संतुलित करतात. हे तिन्ही घटक शरीराचे पोषण करणारे, शरीराचे बल वाढविणारे असतात. हे वडे करायला सोपे असतात व यात लागणारे सर्व घटकपदार्थ घरात सहज उपलब्ध असतात.

  • तांदूळ - ७५० ग्रॅम

  • अख्खे उडीद - २०० ग्रॅम

  • गहू - ५० ग्रॅम

कृती -

  • तीनही घटकपदार्थ नीट धुऊन वाळवून, लोखंडी कढईत भाजून त्यांचे जाडसर पीठ करून घ्यावे.

  • तीनही पिठे व्यवस्थित एकत्र करून त्यात चवीपुरता मिरची-आल्याचा ठेचा, हिंग, हळद, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.

  • मोहन घालून गरम पाणी घालून पीठ घट्टसर मळावे.

  • वडे थापून, गरम तेलात छान तांबूस रंगावर तळून घ्यावे.

  • वडे दही, आमसुलाची चटणी, हिरवी चटणी यांच्याबरोबर वाढावे.

श्राद्धाला आवळकाठी व आमसुलाची चटणीही केली जाते. ही चटणी वडे पचायला मदत करते तसेच रुचकर असते.

तांदळाची खीर

श्राद्धपक्षात केली जाणारी दुसरा महत्त्वाचा पदार्थ आहे तांदळाची खीर. खिरीला आयुर्वेदात ‘पायसम्’ म्हटले जाते.

पायसं परमान्नं स्यात्क्षीरिकापि तदुच्यते ।

शुद्धेऽर्धपक्वे दुग्धे तु घृताक्तांस्तण्डुलान्पचेत्।

ते सिध्दाः क्षीरिका ख्याता ससिताज्ययुतोत्तमा

क्षीरिका दुर्जरा प्रोक्ता बृंहणी बलवर्धिनी।।

विष्टम्भिनी हरेत् पित्तं रक्तपित्तान्मारुत्वन्।

पूर्वीच्या काळी खीर फक्त तांदळांपासून केली जात असे, सध्या मात्र पायसम् अनेक वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. पायसम् ला परमान्न, क्षीरीका, क्षीरान्न वगैरे नावांनाही ओळखले जाते. खीर करायची पद्धत अगदी सोपी आहे.

कृती -

  • प्रथम दूध थोडे आटवावे.

  • तांदूळ धुऊन वाळवावे. तांदूळ तुपावर भाजून त्यात घट्ट केलेले दूध घालावे. मंद आचेवर व्यवस्थितपणे शिजवावे. शिजवताना खडीसाखर व तूप घालावे. चवीनुसार वेलची पूड, केशर, बदाम, काजू वगैरे गोष्टी घालता येतात.

खीर शरीराचे बृंहण करते, बल वाढवते, रक्तपित्त-पित्त वगैरे त्रास कमी करते, वातदोष संतुलित करते. वजन वाढत नसणाऱ्यांसाठी, ताकद कमी झालेल्यांसाठी, शरीरात पित्तदोषाशी निगडित त्रास असणाऱ्यांसाठी ही खीर उत्तम ठरते. पचनशक्ती चांगली नसणाऱ्यांसाठी, कफसंबंधित त्रास असणाऱ्यांसाठी किंवा मधुमेह असणाऱ्यांसाठी खीर उपयुक्त नसते.

आरोग्याचा विचार करून अशा केलेल्या अनेक जीवनातील गोष्टी, सणसमारंभातील गोष्टी, विशेष पाककृती हे आयुर्वेदाचे वैशिष्ट्य आहे. आयुर्वेद हे असे एकमेव शास्त्र आहे ज्याने आहार औषध म्हणून कसा वापरावे हे आपल्याला दाखवून दिलेले आहे. या श्राद्धपक्षाच्या संपूर्ण काळात किमान ३-४ वेळा तरी पौष्टिक वडे व खीर करून खावी. अर्धी वाटी खीर, एखादा-दुसरा वडा खाणे आरोग्यासाठी उत्तम ठरते; परंतु त्याचा विपर्यास करून एकाच बैठकीत ३-४ वाट्या खीर खाणे, ताटभर वडे फस्त करणे हे आरोग्यदायी नाही, हे लक्षात ठेवणेही आवश्यक आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.