ढिंग टांग : जागावाटपाची त्रिसूत्री…!
esakal September 20, 2024 11:45 AM

निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. तरी नोव्हेंबरात त्या होतील, असे साधारणपणे म्हटले जाते. विविध पक्षांमध्ये जागावाटपाची चर्चा सुरु आहे. आपापल्या आवडत्या पक्षाचे तिकिट मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांमध्ये चढाओढ लागली असून ती अक्षरश: ‘चढा’ आणि ‘ओढ’ आहे. अशा प्रसंगात डोके शांत ठेवावे लागते. चार डावपेच लढवावे लागतात. मुख्य म्हणजे जागावाटपाचे नेमके सूत्र काय, हे ध्यानी घ्यावे लागते.

उदाहरणार्थ, एखादे सूत्र पक्षाने पक्के केले तरी प्रत्यक्षात त्याचा अर्थ वेगळाच असतो, आणि तो इच्छुक उमेदवाराला न कळल्याने त्याचे तिकिट कापले जाते. असे घडायला नको, म्हणून आम्ही येथे काही मार्गदर्शिका देत आहो. केवळ अज्ञानापोटी कुणाचे नुकसान होऊ नये, एवढ्याच विशुद्ध हेतूने आम्ही ही मार्गदर्शिका विशद करीत आहो.

ढोबळपणे पाहू गेल्यास तीन सूत्रे महत्त्वाची असतात. त्या त्रिसूत्रीचाच विचार आपण तूर्त करु. हल्ली तीन या आकड्याला महत्त्व आहे. सत्ताधारी तीन, विरोधी पक्षही तीन!

१. जिंकेल त्याची जागा : जवळपास प्रत्येक पक्ष या सूत्राचा अवलंब करताना दिसेल. सध्या ढोबळमानाने सहा मोठे पक्ष रिंगणात आहेत. प्रत्यक्षात हे दोन- तीनच पक्ष आहेत, पण फुटलेले असल्याने त्यांची संख्या मोठी दिसते, इतकेच. प्रत्येक पक्ष ‘जिंकेल त्याची जागा’ असे म्हणत जागावाटपाच्या वाटाघाटींना बसतो आहे. आता जिंकेल त्याची जागा म्हणजे नेमके काय? हा खरा सवाल आहे.

गेल्या निवडणुकीत ज्या पक्षाने जी जागा जिंकली, ती त्याच पक्षाला यंदाच्या निवडणुकीतही मिळेल, असा त्याचा ढोबळ अर्थ काढला जाऊ शकतो. पण पक्ष फुटलेले असल्याने पंचाईत झाली आहे! गेल्या वेळेस आपण जिंकलेली जागा आता फुटीर गटाकडे गेली असल्याने त्यावर हक्क कसा सांगावा? असा नवा प्रश्न उभा राहतो. अमूक अमूक मतदारसंघात आम्हीच जिंकतो, असे ठामपणाने सांगणारा एकही पक्ष सध्या नाही.

किंबहुना, सगळेच पक्ष आम्हीच जिंकतो, असे ठामपणाने सांगणारे आहेत, असे म्हटले तरी चालेल. ठामपणा हा यातला महत्त्वाचा शब्द आहे. अमूक एक जागा मीच जिंकेल, (जिंकेन) म्हणून जागा माझी असाही याचा अर्थ होऊ शकतोच. हे मूलभूत सूत्र वस्तुत: (तिकिट) जिंकेल, त्याची जागा असे आहे. पण त्यातील तिकिट हा शब्द सायलेंट आहे.

२. निवडून येण्याची क्षमता : निवडून येण्याची क्षमता हा थोडा नाजूक प्रकार आहे. याचे कारण इथे क्षमता महत्त्वाची आहे. निवडून येण्याच्या क्षमतेत अनेक प्रकारच्या क्षमता अनुस्यूत आहेत. उदाहरणार्थ, खर्च करण्याची क्षमता, बिर्याणी खिलवण्या-पिलवण्याची क्षमता, जाकिटे, सदरे भराभर बदलण्याची क्षमता, जाग्रणे करण्याची क्षमता, भाषणे करण्याची क्षमता वगैरे. आणखीही बऱ्याच उपक्षमतांचा विचार निवडून येण्याच्या क्षमतेमध्ये करण्यात येतो. एकंदरीत प्रकरण खर्चिक जाते. चांगली तयारी असल्याशिवाय हे कलम पास करणे कठीण जाईल.

३. सर्व्हेचा रिपोर्ट : हे सूत्र अतिशय फसवे! ‘सर्व्हेचा रिपोर्ट तुमच्याबद्दल वाईट आहे, तरीही तिकिट देतोय’ असे कुण्या दुर्दैवी उमेदवाराला ऐकून घ्यावे लागले की, त्याने ताबडतोब साडेसातीचा उपाय म्हणून शनिवारी मारुतरायाच्या देवळात जाण्याचा परिपाठ सुरु करावा. हे लक्षण अतिशय वाईट!! सर्व्हेचे कारण सांगून कुणाचीही तिकिटे कापता येतात. किंबहुना त्यासाठीच या कलमाची सोय करण्यात आलेली असते, हे ध्यानी घ्यावे.

आणखीही काही मूलभूत सूत्रे जागावाटपाच्यावेळी विचारात घेतली जातात. पण त्याचा उघड उल्लेख नको. काही गोष्टी बंद दाराआडच राहिलेल्या बऱ्या!! असो.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.