Nashik Sonpari Bhagar : नाशिकच्या 'सोनपरी' भगरीचा जपानमध्ये डंका! जागतिक आहारतज्ज्ञ परिषदेत नाशिकच्या नावलौकिकात भर
esakal September 20, 2024 11:45 AM

Nashik Sonpari Bhagar : जपानची राजधानी टोकिया येथे नुकत्याच झालेल्या जागतिक आहारतज्ज्ञ परिषदेमध्ये नाशिकच्या नावलौकिकात भर पडली आहे. कारणही तसेच आहे. या परिषदेत भारताचे प्रतिनिधीत्व करताना ‘सोनपरी’ भगरीचे महत्त्व अधोरेखित केले असून, जपानने सोनपरीला पसंती दिली आहे. यामुळे येत्या काळात नाशिकची सोनपरी भगर आहाराच्या दृष्टीकोनातून अधिक जागरुक असलेल्या जपानी नागरिकांच्या आहारात समाविष्ठ असणार आहे. (Nashik Sonpari bhagar dominance in Japan)

टोकियो या शहरात नुकतीच जागतिक आहारतज्ज्ञांची परिषद उत्साहात पार पडली. या परिषदेसाठी भारताचे प्रतिनिधीत्व प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ व आहारविशेषज्ञ डॉ. राज भंडारी यांनी केले होते. या परिषदेमध्ये जगभरातील सकस आहारासंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यावेळी जगभरातून प्रतिनिधीत्व करणाऱ्या सदस्यांनी आपआपल्या देशातील सकस आहारांचे महत्त्व आणि आरोग्यासाठी लाभदायी यासंदर्भातील माहिती दिली.

तर, यावेळी भारताचे प्रतिनिधीत्व करताना डॉ. भंडारी यांनी नाशिकची ‘सोनपरी’ भगर या तृणधान्याचे महत्त्व आणि त्याचे होणारे आरोग्यदायी फायदे यांची माहिती दिली. तृणधान्य प्रकारातील भगरीचे महत्त्व आणि फायदे ऐकून परिषदेतील सदस्य जसे भारावले तसेच, परिषदेचे संयोजक असलेल्या जपान आहारतज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष तेईजी नाकामुरा यांनी सोनपरी भगरपासून बनविणाऱ्या विविध पदार्थांची माहिती घेतली आणि त्याची चवही चाखली. मधुमेहासह लठ्ठपणा कमी करण्यासाठी भगर उपयुक्त असल्याने जपानने भगरीचा आहारात समावेश करण्याचे जोरदार समर्थन केले. (latest marathi news)

ReNew Company: नागपूरमधील प्रकल्प गुजरातला गेल्याच्या बातमीत किती तथ्य? कंपनीचं स्पष्टीकरण आलं समोर

छोरियांची ‘सोनपरी’

नाशिक जिल्हा भगर मिल असोसिएशनचे अध्यक्ष तथा ‘यश फुडस् प्रायव्हेट लिमिटेड’चे महेंद्र छोरिया हे ‘सोनपरी’ भगरीचे उत्पादक आहे. भगरीचा दर्जा आणि चव याला प्राधान्य दिल्याने सोनपरी भगर राज्यातच नव्हे तर, देश आणि परदेशातही पोहोचली आहे. आता लवकरच ती जपानी नागरिकांच्या आहारातही समाविष्ठ होणार आहे.

तृणधान्याला महत्त्व

जपानी नागरिकांचे दीर्घआयुष्यमान असते. यामागे, त्यांच्या आहारात तृणधान्याचा समावेश अधिक असतो. त्यामुळे निरोगी आणि दीर्घायुष्य लाभते, असा त्यांचा दावा आहे. जपानमध्ये भगरीचा प्रचार व प्रसार करण्यावर यावेळी भर देण्यात आल्याने भारतीय चमुने त्यांचे आभारही मानले.

"नाशिकची सोनपरी भगरीचे जपानमध्ये कौतूक झाल्याचा आनंद आहे. सोनपरीच नव्हे तर नाशिक जिल्ह्यातील भगर व्यावसायिकांनाही एक नवे दालन मिळणार आहे. भगरीला परदेशात व्यासपीठ उपलब्ध झाले आहे."

- महेंद्र छोरिया, अध्यक्ष, नाशिक जिल्हा भगर मिल असोसिएशन.

Worli Vidhan Sabha: वरळीतून अमित ठाकरे नव्हे तर मनसेच्या 'या' फायरब्रँड नेत्याला मिळणार तिकीट; राज ठाकरे फोडणार प्रचाराचा नारळ
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.