बारामती बाजारात उडदाने खाल्ला 'भाव'
esakal September 21, 2024 10:45 AM

काटेवाडी, ता. २० : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लिलाव बाजारामध्ये उडीद पिकाला प्रतिक्विंटल ७ हजार ७५२ असा उच्चांकी दर मिळाला आहे. त्याचप्रमाणे मुगाची देखील थोड्या प्रमाणात आवक होऊ लागली आहे. दोघांनीही लिलाव बाजारामध्ये उच्चांकी प्रतिक्विंटल १४ हजार १०० असा बाजारभाव मिळवला आहे.

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या पुरंदर, फलटण, बारामती, इंदापूर तसेच सोलापूर जिल्ह्यातील काही भागातून उडदाची आवक होत आहे. उडीद बरोबरच गहू, गावरान ज्वारी, हायब्रीड ज्वारी, बाजरी, मूग व हरभरा आदींची आवक होत आहे. दरम्यान, उडीद ही ७० ते ८० दिवसात येणारी पिके असल्यामुळे थोड्याशा पावसाचा देखील लाभ उठवू शकतात. दुबार तसेच मिश्र पीक पद्धतीसाठी ही दोन्ही पिके अतिशय महत्त्वाची आहेत. उडदाचे १० ते १२ क्विंटल हेक्टरी उत्पन्न मिळते. खरीप हंगामामध्ये तुरीच्या खालोखाल मूग आणि उडीद ही महत्त्वाची पिके गणली जातात. सातारा व पुणे जिल्ह्याच्या जिरायती भागात खरीप हंगामामध्ये मुग व उडीद पिकाची लागवड मुख्य व आंतरपीक म्हणून करण्यात येते. या पिकांचा कालावधी दोन ते अडीच महिन्याचा असतो. कमी कालावधीमध्ये अधिक आर्थिक फायदा मिळवून देणारी पिके म्हणून शेतकऱ्यांचा कल असतो. त्याचप्रमाणे या पिकाच्या तोडणीनंतर पाला पाचोळा जमिनीत पडून जमिनीचा पोत सुधारतो. शेंगवर्गीय पीक असल्यामुळे रायझोबियम जीवाणूद्वारे जमिनीतील नत्राचा साठा वाढण्यास मदत होते. त्यामुळे इतर पिकांना देखील त्याचा फायदा होत असतो. अंतर पिकांमध्ये मूग उडीद लावल्यानंतर मुख्य पिकाच्या लागवडीचा व महिने तिचा खर्च देखील शेतकऱ्यांचा निघतो.

शेतकऱ्यांनी शेतमाल लगेच लिलाव बाजारात आणण्याची घाई करू नये. आपला माल व्यवस्थित ग्रेडिंग व सेटिंग करून आणावा म्हणजे जादा दर मिळेल. तसेच बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल तारण कर्ज योजना सुरू केली गेली आहे. या योजनेमध्ये गहू, बाजरी, ज्वारी, उडीद व सोयाबीन या पिकांचा समावेश करण्यात आला आहे. भांडवली गरज असणाऱ्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
- अरविंद जगताप, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती बारामती

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.