कोळंब विभागात लसीकरण मोहीम
esakal September 22, 2024 01:45 AM

कोळंब विभागात
लसीकरण मोहीम
मालवण : लहान मुलांना दिली जाणारी ‘बीसीजी’ लस आता टीबी होऊ नये, म्हणून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून १८ वर्षांवरील नागरिकांना दिली जाणार आहे. कोळंब विभागात यासाठी खास मोहीम प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातर्फे राबविण्यात येत आहे. यात २३ सप्टेंबरला कोळंब उपकेंद्र, १८ नोव्हेंबरला न्हिवे, २२ ला खैदा, कातवड येथे सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत लस देण्यात येणार आहे. साठ वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिक, डायबिटीस नागरिक, पूर्वी टीबी असणाऱ्या व्यक्ती व त्यांच्या घरातील १८ वर्षांवरील सदस्य, धूम्रपान किंवा तंबाखू सेवन करणाऱ्या व्यक्तींनी भविष्यात आपल्याला टीबीचा संसर्ग होऊ नये, यासाठी कोळंब, न्हिवे व कातवड येथील नागरिकांनी संपर्क साधायचा आहे. आरोग्य उपकेंद्रातून आशा स्वयंसेविका व आरोग्य सेविका, आरोग्य सेवक यांच्याकडून योग्य माहिती देण्यात येणार आहे. परिसरातील जास्तीत जास्त ग्रामस्थांनी लस घ्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. पवार यांनी केले आहे.
---
साळशीत आजपासून
अखंड हरिनाम सप्ताह
देवगड : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या साळशी (ता. देवगड) येथील इनामदार देवी पावणाई देवालयात २२ ते २८ सप्टेंबर या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. या हरिनाम सप्ताहात भजनी मंडळांनी दिंड्या घेऊन सहभागी व्हावे व पांडुरंगाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थ मंडळी, बारा-पाच मानकरी व देवस्थान विश्वस्त समितीने केले आहे. सायंकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत येणाऱ्या भजनी मंडळींसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
--------------
गणित संबोध परीक्षेत
नेरूर विद्यालयाचे यश
कुडाळ : महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळांतर्गत घेण्यात आलेल्या गणित संबोध परीक्षेत नेरूर-माड्याचीवाडी माध्यमिक विद्यालयाने यश मिळविले. विद्यालयातील आठवीचे वीस विद्यार्थी यात प्रविष्ट झाले होते. विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला. यातील १९ विद्यार्थी विशेष श्रेणीत, तर एक विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाला. या सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक अनंत सामंत व शिक्षिका प्रगती निवतकर यांनी मार्गदर्शन केले. एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन समाधान परब, सचिव अवधूत रेगे व संस्था सदस्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
---
कणकवलीत आज
संवाद कार्यक्रम
कणकवली : सत्यशोधक समता प्रतिष्ठान, सिंधुदुर्गतर्फे अंकुश कदम लिखित ‘हस्तक्षेपाच्या कणखर भूमीत’ या पुस्तकावर संवाद कार्यक्रमाचे आयोजन उद्या (ता. २२) सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत येथील नगरवाचनालय सभागृह येथे केले आहे. संवादामध्ये पुस्तकाचे लेखक अंकुश कदम यांच्यासह प्रा. अनिल फराकटे, ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर ढगे, संपत देसाई, आदी सहभागी होणार आहेत.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.