ENG vs AUS : ऑस्ट्रेलियाचा सलग 14वा एकदिवसीय विजय, दुसऱ्या सामन्यात इंग्लंडचा 68 धावांनी धुव्वा
GH News September 22, 2024 02:07 AM

ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमची एकदिवसीय क्रिकेटमध्ये विजयी घोडदौड सुरुच आहे. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये 68 धावांनी विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाचा हा या 5 सामन्यांच्या मालिकेतील सलग दुसरा विजय ठरला आहे. तसेच ऑस्ट्रेलियाचा हा 2023 पासूनचा सलग 14 एकदिवसीय विजय आहे. इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 271 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र इंग्लंडला या धावांचा पाठलाग करताना धड 41 ओव्हरही पूर्ण खेळता आलं नाही. इंग्लंडचा डाव हा 40.2 ओव्हरमध्ये 202 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाकडून जेमी स्मिथ याने 49 धावा केल्या. तर इतरांनाही योगदान दिलं. मात्र ते योगदान विजय मिळवण्यासाठी अपुरे पडले.

इंग्लंडकडून जेमी स्मिथ याने 61 बॉलमध्ये 6 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने 49 धावा केल्या. ओपनर बेन डकेट याने 32 तर फिलिप सॉल्ट याने 12 धावांचं योगदान दिलं. कॅप्टन हॅरी ब्रूकने 4 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. विल जॅक्स आला तसाच परत गेला. लियाम लिविंगस्टोन यानेही तसंच केलं. या दोघांना खातं उघडता आलं नाही. त्यानंतर शेपटीच्या त्रिकुटातील प्रत्येकाने 20 प्लस स्कोअर करुन विजयाचा आशा कायम ठेवल्या. मात्र इंग्लंड पराभव टाळू शकली नाही. जेकब बेथेल 25, ब्रायडन कार्स 26 आणि आदिल रशीद याने 27 धावांचं योगदान दिलं. ओली स्टोन 1 धावेवर आऊट झाला. यासह इंग्लंडचा डाव आटोपला. मॅथ्यू पॉट्स हा 7 धावांवर नाबाद राहिला.

ऑस्ट्रेलियाकडून एकूण 6 जणांनी बॉलिंग केली. त्यापैकी मॅथ्यू शॉर्ट याला इतरांच्या तुलनेत फार संधी न मिळाल्याने विकेट मिळाली नाही. मॅथ्यूने एकमेव ओव्हर टाकली. तर मिचेल स्टार्क याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. जोश हेझलवूड, आरोन हार्डी आणि ग्लेन मॅक्सवेल या तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. एडम झॅम्पा याने 1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.

ऑस्ट्रेलियाचा सलग 14 वा एकदिवसीय विजय

ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : मिचेल मार्श (कॅप्टन), ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, ॲरॉन हार्डी, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : हॅरी ब्रूक (कर्णधार), फिलिप सॉल्ट, बेन डकेट, विल जॅक्स, जेमी स्मिथ (विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, ऑली स्टोन, मॅथ्यू पॉट्स आणि आदिल रशीद.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.