Nagpur Crime : वाठोड्यात हातमजुराचा खून,शिवीगाळ करीत असल्याने संतापून मित्राला संपविले : आरोपींना अटक
esakal September 22, 2024 04:45 PM

नागपूर : मित्राकडून वारंवार शिवीगाळ होत असल्याने संतापून दोन मित्रांनी चाकूने वार करीत मित्राचा खून केला. ही घटना वाठोड्यातील शैलेशनगर येथील नाल्याजवळील जंगलात शनिवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून खून करणारा आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती आहे.

काल्या वंजारी (वय २२, रा. सुरजनगर) असे मृताचे नाव असून रजवा (वय २०) आणि १७ वर्षीय मुलगा अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल्या, रजवा आणि अल्पवयीन आरोपी हे तिघेही हातमजुरीचे काम करतात. गेल्या काही दिवसांपासून काल्या हा अल्पवयीन आरोपीला शिवीगाळ करून त्याला मारहाण करायचा. दरम्यान अनेकदा असे होत असल्याने तो चांगलाच संतापला होता.

शनिवारी सायंकाळी काल्याने त्याच्यासह रजवा याला शैलेशनगर जवळील कोहीनूर लॉनच्या मागच्या भागाला असलेल्या जंगलातील नाल्याच्या भिंतीजवळ भेटण्यास बोलाविले. तिथे गेल्यावर त्याने पुन्हा अल्पवयीन आरोपीला शिवीगाळ केली. त्यामुळे संतापून त्याने काल्याचा पोटावर आणि छातीत चाकूने वार करीत त्याचा रक्ताच्या थारोळ्यात लोळविले.

यावेळी पोलिस हवालदार अश्विन बागडे आणि त्याचे पथक तेथून जात असताना, आरोपीचा शर्ट एका बाजूने रक्ताने माखलेला दिसून आला. पथकाने वाहन थांबवून त्याला विचारणा केली असता, त्याने काल्या वंजारीचा खून केल्याची माहिती केली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत, घटनास्थळ गाठून पंचनामा करीत मृतदेह मेडिकलला पाठविला. यावेळी चाकू जप्त करीत, दोघांविरोधात गुन्हा दाखल करीत अटक केली.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.