इथला माणूस बेघर होतोय मग बाहेरच्यांना कडेवर कसं घ्यायचं? - राज ठाकरे
Times Now Marathi September 22, 2024 04:45 PM

Raj Thackeray: वरळीतील जांबोरी मैदानात व्हिजन वरळी या कार्यक्रमाचे उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाषण करताना राज ठाकरेंनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे. राज ठाकरे म्हणाले, मोठ्या प्रकल्पाचा ज्यावेळी येतो किंवा इतक्या मोठ्या प्रकल्पाचा विचार होतो तेव्हा आधी तुमच्यासोबत बोललं पाहिजे. तुमची मतं विचारात घेतली पाहिजेत. पण आधी प्रकल्प लादायचा आणि मग तुम्हाला विचारायचं काय पाहिजे आहे तुम्हाला? तोपर्यंत हातातून गोष्टी निघून गेलेल्या असतात. हे फक्त वरळीत नाही तर जागोजागी सुरू आहे. हे जिथेजिथे सुरू आहे तिथे बहुतांश नागरिक हे मराठी आहेत. हे तुमच्याबाबत जे कोणी करत आहेत त्या सर्व लोकांना आजपर्यंत मतदान होत आलं आहे. त्यामुळे त्यांना वाटतं की, कोण तुम्ही? जे आम्ही सांगू ते तुम्ही मान्य कराल.

बिल्डरसारख्या औलादींना....
आपल्याकडे डेव्हलपमेंट प्लान होतो पण टाऊन प्लानिंग होत नाही. आपल्याकडे किती लोकसंख्या वाढणार?, इतके रस्ते आहेत का?, मुलांसाठी शाळा-कॉलेजेस येणार का? चांगले हॉस्पिटल येणार का?, मार्केट येणार का?, चांगले डॉक्टर्स येणार का?, थिएटर्स येणार आहेत का?. या सर्वांचा काहीही विचार नाही. आम्ही सुद्धा विचारत नाही. आमम्ही केवळ स्क्वेअर फूटमध्ये अडकलोय. आम्ही प्रश्न विचारत नाही आणि कुठलाही बिल्डरला अपेक्षा सुद्धा नसते की तुम्ही प्रश्न विचारावे. तुमची स्वत:ची हक्काची जमीन डेव्हलपेंटला देताना तुम्हीच प्रश्न विचारत नाहीत. बिल्डरसारख्या औलादींना हेच हवं असतं. तुमच्यात जेवढी फूट पडेल तेच त्यांना हवं असतं. तुम्ही एकत्र राहणं आणि एकमुखाने बोलायचं गरजेचं आहे.

हे पण वाचा : मुंबईतील सर्वात मोठ्या जलबोगद्याचे काम सुरू; 21 किलोमीटर लांब अंडरग्राऊंड वॉटर टनेलमधून मुंबईत पोहोचणार पाणी

इथल्या लोकांचा लोकसंख्या वाढवण्यात हात नाहीये तर...एक छोटी जागा आहे त्या जागेत किती जण राहू शकतात त्याला काही मर्यादा आहे की नाही? मग जेव्हा लोकसंख्या वाढायला लागते... आज मुंबईची लोकसंख्या पाहिली तर त्यात बाहेरुन येणाऱ्यांची संख्या पाहिली.. मग ते येत आहेत तर रस्ते केले पाहिजेत, इमारती बांधल्या पाहिजेत, हॉस्पिटल बांधले पाहिजेत. इतकी मुंबई वाढत जातेय. वाढत जाण्यामागे इथल्या लोकांचा लोकसंख्या वाढवण्यात हात नाहीये तर येणाऱ्या लोकांचा आहे. मग त्यांना सुविधा देण्यात आम्ही खर्च करतोय. इतकं सर्व करुन आमचा शेतकरी आत्महत्या करतोय. या राज्याचा मूळ पैसा ज्या लोकांसाठी खर्च व्हायला पाहिजे तिथे न करता या सर्व सुविधांसाठी खर्च होतोय.

बाहेरच्यांनाही आम्ही कडेवर घ्यायचं हे कसं शक्य होईल? एक आपण उदाहरण म्हणून ठाणे जिल्हा पाहिला तर. जगाच्या पाठीवर असा जिल्हा तुम्हाला असा एक जिल्हा मिळणार नाही. मुंबईत मनपा एक, पुणे जिल्ह्यात दोन मनपा आहेत. ठाणे हा एकमेव जिल्हा आहे जिथे 8 महानगरपालिका आहेत. ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी लोकसंख्या वाढवली? नाही... बाहेरुन येणाऱ्या नागरिकांची सर्वाधिक लोकसंख्या ही ठाणे जिल्ह्यात येते. त्यानंतर ते इतर जिल्ह्यात जातात. इथला माणूस सुखी झाल्यावर बाहेरचा माणूस आला तर समजून घेऊ, सांभाळून घेऊ आम्ही. पण इथला माणूस बेघर होतोय आणि बाहेरच्यांनाही आम्ही कडेवर घ्यायचं हे कसं शक्य होईल?
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.