“शेवटच्या क्षणाला महाविकास आघाडी तुटणार”, महायुतीतील नेत्याचे मोठं भाकित, म्हणाला “संजय राऊत…”
GH News September 22, 2024 05:10 PM

Maharashtra Vidhansabha Election 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सर्वच पक्ष विधानसभेची जोरदार तयारी करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवरुन जरोदर खडाजंगी पाहायला मिळत आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत होणार आहे. आता महायुतीतील एका नेत्याने शिवसेना खासदार संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे.

महाविकासआघाडीत संजय राऊतांच्या वक्तव्याला किंमत नाही, ते काहीही बोलतात, असा टोला महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी लगावला. नुकतंच संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेतली. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या या पत्रकार परिषदेत त्यांनी संजय राऊतांवर जोरदार निशाणा साधला.

“शेवटच्या घडीला महाविकासआघाडी राहणार नाही”

“कोण कोणामुळे पडलं आणि कोण कुणामुळे जिंकून येईल हे येणाऱ्या विधानसभेत दिसेल. संजय राऊत यांच्या पाठिंब्यामुळे जर काँग्रेस पुढे गेली असेल तर काँग्रेसने याकडे लक्ष द्यावे. काँग्रेस यांना जुमानत नाही. शेवटच्या घडीला महाविकासआघाडी राहणार नाही. शेवटच्या क्षणाला महाविकासआघाडी तुटणार”, असे भाकित संजय शिरसाट यांनी केले.

“संजय राऊत हे काही ब्रह्मदेव आहे का?”

“संजय राऊतच्या वक्तव्याला कोणतीही किंमत नसते. ते काहीही बोलतात, हे राहणार नाही, ते होणार नाही. ते जे बोलतात, त्याच्या व्यतिरिक्त घडलेलं आतापर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळे येणार सरकारसुद्धा महायुतीचेच राहणार आहे. संजय राऊत बोलल्याने काही परिणाम होत नाही. संजय राऊत हे काही ब्रह्मदेव आहे का?” असा सवालही संजय शिरसाट यांनी केला.

“संजय राऊत हा माणूस काहीही करू शकतो”

“संजय राऊत हे झोपेतून उठून डोळे चोळत चोळत बोलतात. त्याचा राजकारणावर काहीही परिणाम होत नसतो. संजय राऊत हा माणूस काहीही करू शकतो तो पक्षाचा प्रमुख आहे. किती पैसे घेतले काय घेतले हे त्याचे त्यालाच माहित आहे. आता ठाकरे गटामध्ये नेमकं प्रमुख कोण आहे हेच ठरवणं महत्त्वाचं आहे. एखाद्याची उमेदवारी शिवसेनाप्रमुख असताना जाहीर करण्याची कोणाची हिंमत झाली नव्हती. परंतु आजकालचे दलाल लोक हे उमेदवार जाहीर करत आहे. त्यामुळे चोराच्या हातात तिजोरीची चावी दिली तर तो चोरी करणारच”, असा टोलाही संजय शिरसाट यांनी लगावला.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.