मल्टिवर्स – गुंतवून ठेवणारा अनुभव ‘द प्रेस्टीज’
Marathi September 22, 2024 05:24 PM

>> डॉ. विचित्र

कल्ट क्लासिक चित्रपटांच्या रांगेत स्थान मिळवणारा ‘द प्रेस्टीज’ चित्रपट एक मनोवैज्ञानिक, चक्रावून टाकणारा आणि पूर्णपणे गुंतवून ठेवणारा अनुभव देतो.

प्रत्येक महान जादूच्या युक्तीत तीन भाग किंवा कृती असतात. पहिल्या भागाला “द प्लेज” असे म्हणतात. जादूगार तुम्हाला काहीतरी सामान्य दाखवतो: पत्त्यांचा डेक, पक्षी किंवा माणूस. तो तुम्हाला ही वस्तू दाखवतो. कदाचित तो खरा, अपरिवर्तित, सामान्य आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला त्याची तपासणी करण्यास सांगेल. पण अर्थातच… ते बहुधा नाही. दुसऱ्या कृतीला “द टर्न” म्हणतात. जादूगार सामान्य काहीतरी घेतो आणि त्याला काहीतरी विलक्षण करायला लावतो. आता तुम्ही रहस्य शोधत आहात… पण तुम्हाला ते सापडणार नाही, कारण अर्थातच तुम्ही शोधत नाही आहात. तुम्हाला खरोखर जाणून घ्यायचे नाही. तुम्हाला फसवायचे आहे. पण तू अजून टाळ्या वाजवणार नाहीस. कारण काहीतरी अदृश्य करणे पुरेसे नाही; तुम्हाला ते परत आणावे लागेल. म्हणूनच प्रत्येक जादूच्या युक्तीची तिसरी कृती असते, सर्वात कठीण भाग, ज्याला आपण “प्रतिष्ठा” म्हणतो.

साय फाय चित्रपट आणि क्रिस्टोफर नोलान ह्यांचे एक विशेष नाते आहे. अशा नोलानबरोबर जेव्हा ह्युज जॅकमन, क्रिश्चियन बेल, स्कार्लेट जॉन्सन आणि मायकेल केनसारखे अप्रतिम कलाकार जोडले जातात तेव्हा पडद्यावर साकार होते ‘द प्रेस्टीज’सारखी अप्रतिम कलाकृती. चित्रपट पूर्णपणे साय फाय नसला तरी साय फायच्या जोडीला एक मनोवैज्ञानिक चक्रावून टाकणारा आणि पूर्णपणे गुंतवून ठेवणारा अनुभव नक्की आहे. 2006 साली क्रिस्टोफर प्रीस्ट या कादंबरीकाराच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारलेला हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि बघता बघता कल्ट क्लासिक चित्रपटांच्या रांगेत त्याने स्थान मिळवले.

चित्रपटाच्या कथेत आपण दोन जादुगारांना भेटतो. रॉबर्ट एंजियर अर्थात ह्युज जॅकमन आणि अल्फ्रेड बॉर्डेन अर्थात क्रिश्चियन बेल. दोघेही आपले पाय स्थिरावण्यासाठी धडपडत असतात. त्यांचा उमेदीचा काळ सुरू असतो आणि दोघेही मिल्टन नावाच्या जादुगाराचे सहाय्यक म्हणून काम करत असतात. रॉबर्टची बायको ज्युलियादेखील त्यांच्या खेळात सहभागी होत असते. मिल्टनचा हुकुमाचा पत्ता असतो तो म्हणजे ‘अंडर वॉटर एस्केप’ हा प्रयोग. ज्युलिया हात बांधलेल्या अवस्थेत पाण्याच्या बंद टँकमधून स्वतची सुटका करून घेत असते. एकदा या प्रयोगात अपघात होतो आणि ज्युलिया मरण पावते. त्या शेवटच्या प्रयोगात तिच्या हाताच्या दोरीला अल्फ्रेडने गाठ मारलेली असते जी तिला सोडवता येत नाही. इथून चालू होते दोन जादुगारांच्या मधले वैमनस्य आणि स्वतला ग्रेट सिद्ध करण्याची धडपड.

एकमेकांच्या शोमध्ये वेष पालटून घुसणे आणि प्रयोगाची वाट लावणे आता सुरू होते. त्यातच अल्फ्रेड ‘द ट्रान्सपोर्टेड मॅन’ नावाचा एक अद्भुत प्रयोग घेऊन येतो, ज्यात तो एका केबिनमध्ये शिरून दुसऱया केबिनमधून बाहेर येत असतो. त्याचा हा प्रयोग त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळवून द्यायला लागतो. मिल्टनची साथ सोडून रॉबर्टची मदत करत असलेला इंजिनीअर कटर अर्थात मायकल केन अल्फ्रेड या ट्रिकसाठी डुप्लिकेटचा वापर करतो या मतावर ठाम असतो. रॉबर्ट आणि त्याची नवी साथीदार ओलिव्हिया अर्थात स्कार्लेट जॉन्सन मात्र त्याच्याशी सहमत नसतात. एका केबिनमध्ये आत शिरणारा आणि दुसरीकडून बाहेर पडणारा अल्फ्रेड एकच व्यक्ती आहे यावर ते ठाम असतात.

आता सुरू होते अल्फ्रेडच्या खेळामागची युक्ती समजून घेण्याची धडपड. ही धडपड रॉबर्टला जगप्रसिद्ध अशा निकोला टेस्ला या वैज्ञानिकापर्यंत पोहोचवते. तोदेखील या ‘द ट्रान्सपोर्टेड मॅन’च्या खेळासाठी आवश्यक असे मशीन रॉबर्टसाठी बनवतो. पण हे मशीन वस्तूला एका ठिकाणाहून ट्रान्स्पोर्ट न करता चक्क त्या वस्तूचा हुबेहूब क्लोन (नक्कल) बनवणारी असते. या मशीनचा एक वेगळाच उपयोग करण्याचे रॉबर्ट ठरवतो आणि कथेत प्रचंड वेगवान घडामोडी घडू लागतात.

रॉबर्ट मशीनचा काय उपयोग करतो? अल्फ्रेडच्या जादूमागचे रहस्य काय असते? चित्रपटाचा शेवट नक्की काय होतो? हे पडद्यावर नक्की अनुभवायला हवे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.