22 September in History: नाटककार-दिग्दर्शक पुरूषोत्तम दारव्हेकर यांचे निधन
esakal September 22, 2024 08:45 PM

२२ September in History: आजच्या दिवशी नाटककार-दिग्दर्शक पुरूषोत्तम दारव्हेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. तसेच आजच्या दिवशी कोणत्या महत्वाच्या घडामोडी घडल्या हे सविस्तरपणे जाणून घेऊया.

1791 - ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ आणि पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ मायकेल फॅरेडे यांचा जन्म.

1882 - दुसऱ्या महायुद्धातील जर्मन सेनापती फील्ड मार्शल विल्हेम कायटेल यांचा जन्म. हिटलरचे पाठीराखे आणि मर्जीतले असल्याने 1938 मध्ये जर्मन सैन्याच्या पुनर्रचनेची कामगिरी त्यांच्यावर सोपवून त्यांना कर्नल जनरलचा हुद्दा देण्यात आला.

1915 - नामवंत चित्रपट दिग्दर्शक अनंत माने यांचा जन्म. पठ्ठे बापूराव, प्रीतीसंगम, धाकटी जाऊ, दोन घडीचा डाव, सांगत्ये ऐका, सवाल माझा ऐका, केला इशारा जाता इ. मराठी चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. पिंजरा, लक्ष्मी, सुशीला, आई इ. तीसहून अधिक चित्रपटांच्या कथा त्यांनी लिहिल्या. त्यांचे "अनंत आठवणी' हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.

1923 - ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व ख्यातनाम उद्योगपती रामकृष्ण बजाज यांचा जन्म.

1955 - दूरचित्रवाणीचं सर्वप्रथम व्यावसायिक प्रसारण इंग्लंडमध्ये सुरु.

1991 - रंगभूमीवरील आणि हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री दुर्गा खोटे यांचे निधन. सुमारे 50 वर्षांच्या कारकिर्दीत 300 चित्रपटांतून त्यांनी भूमिका केल्या. "सीता', "पृथ्वीवल्लभ', "हम एक है', "बावर्ची', "खिलौना' या हिंदी चित्रपटांतील ,"अयोध्येचा राजा', "मोरुची मावशी', "सीता स्वयंवर', "माया बाजार', "जशास तसे' या मराठी चित्रपटातील व "कीचकवध', "भाऊबंदकी', "खडाष्टक' या नाटकांतील त्यांच्या भूमिका गाजल्या. 1982 मध्ये "मी दुर्गा खोटे' हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले.

1992 - आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वास्तुतंत्रज्ञ व मुंबईचे माजी शेरीफ ज. ग. बोधे यांचे निधन. मुंबईचे ब्रेबॉर्न स्टेडिअम, प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियमचा डोम, पुण्यातील लकडी पूल ही त्यांची बांधकामे.

1994 - जुन्या पिढीतील नामवंत भावगीतगायक जी. एन. जोशी यांचे निधन. एचएमव्ही या कंपनीसाठी काम करताना त्यांनी अनेक गायकांच्या ध्वनिमुद्रिका काढून त्यांना प्रकाशात आणले.

1999 - बृहन्मुंबई पोलिस दलातील उपनिरीक्षक बाळासाहेब रामचंद्र घाडगे यांनी डोव्हर इंग्लिश खाडी ते डॅजेनिस किनारा हे 35 किलोमीटरचे अंतर 9 तास 52 मिनिटांत विक्रमी वेळेत पार करून भारतीय जलतरणाच्या इतिहासात नव्या पराक्रमाची नोंद केली.

२१ September in History: राज्यातील भाजप-सेना वाद २५ वर्षांपूर्वीही होताच! १९९९ मध्ये काय झालं होतं?

2000 - प्रसिद्ध बंगाली चित्रपट दिग्दर्शक बुद्धदेव दासगुप्ता यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी "प्रिमिओ स्पेसिएल पर ला रेजिआ' हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर.

2003 - ऑस्ट्रेलियन धर्मप्रसारक ग्रॅहम स्टुअर्ट स्टेन्स व त्यांच्या दोन मुलांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी दारासिंह याला फाशीची शिक्षा ठोठावली व अन्य 12 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

2003: ‘नासा’च्या ‘गॅलिलिओ’ या अंतराळ यानाने पृथ्वीवर शेवटचा संदेश पोचवून गुरूच्या वातावरणात प्रवेश करीत ‘प्राणार्पण’ केले.

2014: आशियायी क्रीडा स्पर्धेत महिलांच्या सांघिक २५ मीटर पिस्तूल नेमबाजी प्रकारात राही सरनोबत, अनिसा सय्यद, हीना सिद्धू या खेळाडूंनी सांघिक कांस्यपदक पटकाविले.

2014: भारताच्या मंगळ मोहिमेत महत्त्वाचा टप्पा गाठला गेला. गेले ३०० दिवस निद्रावस्थेत असलेले मंगळयानावरील इंजिन यशस्वीरीत्या प्रज्वलित केले.

2015: निवडणूक आयोगाने देशातील जनतेला नकारात्मक मतदानाचा अधिकार दिल्यानंतर ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन’ (एनआयडी) या संस्थेने ‘नोटा’चे (वरीलपैकी कोणी नाही) स्वतंत्र चिन्ह तयार केले.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.