NPS Vatsalya Scheme : 'एनपीएस वात्सल्य' बचतीसह पेन्शन सुविधा
esakal September 23, 2024 12:45 PM

केंद्रीय अर्थसंकल्प २०२४ मध्ये केलेल्या घोषणेच्या अनुषंगाने, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘एनपीएस वात्सल्य’ या १८ वर्षांखालील अल्पवयीन मुलांसाठीची बचतीसह पेन्शन सुविधा देणारी योजना दाखल केली आहे.

या योजनेद्वारे सरकारने पालकांना आपल्या मुलांच्या भविष्यासाठी पेन्शन खाते उघडून आणि दीर्घकालीन संपत्तीसाठी चक्रवाढ शक्तीचा फायदा घेऊन मोठी गंगाजळी निर्माण करण्यासाठी हा गुंतवणूक पर्याय उपलब्ध केला आहे. ही योजना पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणामार्फत प्रशासित व नियंत्रित केली जाणार आहे.

योजनेची वैशिष्टे

१ ही योजना गुंतवणुकीचे लवचिक पर्याय उपलब्ध करीत असल्याने, ती सर्व आर्थिक स्तरातील कुटुंबांसाठी उपयुक्त आहे. किमान वार्षिक गुंतवणूक १००० रुपये असून, कमाल गुंतवणुकीवर मर्यादा नाही.

२ हे खाते बँका, पोस्ट ऑफिस, पेन्शन फंडामध्ये पाल्याच्या नावाने आधार व पॅन कार्डच्या आधारे पालकांना उघडता येते.

३ तीन वर्षांच्या लॉक-इन कालावधीनंतर जास्तीत जास्त तीन वेळा शिक्षण, आजारपण आणि अपंगत्वाच्या खर्चासाठी योगदानाच्या २५ टक्क्यांपर्यंत पैसे काढता येतील.

४ पाल्याच्या वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यावर त्याला या योजनेतून बाहेर पडण्याची मुभा आहे. या वेळी गंगाजळीची रक्कम अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असल्यास संपूर्ण निधी, तर ही रक्कम अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक असल्यास २० टक्के रक्कम काढता येईल. बाकीची ८० टक्के रक्कम खाते चालू ठेवायचे असल्यास ॲन्युइटी (पेन्शन) खरेदीसाठी वापरली जाईल.

५ यात गुंतवणुकीचे तीन पर्याय उपलब्ध आहेत. पहिला मॉडरेट लाइफ सायकल फंड आहे, यात ५० टक्के गुंतवणूक इक्विटीमध्ये केली जाते, जे मध्यम उत्पन्नवाढीची संधी देतात. खातेदाराने कोणताच गुंतवणुकीचा पर्याय निवडला नाही, तर त्याने हा पर्याय निवडला आहे, असे गृहीत धरण्यात येते.

दुसरा ऑटो चॉइस लाइफ सायकल फंड पर्याय आहे. यात वयानुसार गुंतवणूक केली जाते. त्यात तीन उप-पर्याय आहेत. तिसऱ्या सक्रिय निवड पर्यायामध्ये शेअरमध्ये ७५ टक्क्यांपर्यंत, कार्पारेट कर्जरोखे, सरकारी रोख्यांमध्ये १०० टक्क्यांपर्यंत आणि पर्यायी मालमत्तेत ६ टक्क्यांपर्यंत गुंतवणूक करता येते. त्यामुळे पालकांना त्यांच्या आवडीनिवडी आणि आर्थिक योजनांशी जुळणारा पर्याय निवडण्याची संधी आहे.

६ पाल्याचा मृत्यू झाल्यास सर्व रक्कम पालकांना मिळेल. पालकाचा मृत्यू झाल्यास उर्वरीत नैसर्गिक किंवा कायदेशीर पालक खाते चालू ठेऊ शकतो.

७ ही सर्व योजना चक्रवाढ शक्तीवर आधारीत आहे व त्यात देशाच्या अर्थव्यवस्थेतील प्रगतीमुळे शेअर बाजारात मिळणारे आकर्षक उत्पन्न या योजनेचा गाभा आहे. मुलांच्या कल्याणासाठी पालकांना मिळालेली ही सुसंधी आहे, असे म्हटले पाहिजे. ‘पीपीएफ’मध्ये रक्कम गुंतविल्यास कोणतीही जोखीम न स्वीकारता पैसे मिळतील; पण थोडे धारिष्ट्य करून शेअरमध्ये गुंतविल्यास चक्रवाढ व्याजाने अधिक लाभ होऊ शकतो.

आव्हाने

‘पीपीएफ’मध्ये रक्कम गुंतविल्यानंतर सध्याच्या ७.१ टक्के दराने नक्की किती रक्कम जमा होणार आहे, याची कल्पना असते व त्याप्रमाणे आर्थिक नियोजन करणे शक्य असते. मात्र, या योजनेत शेअर बाजार व त्यातील उत्पन्न जोखमीवर आधारित असल्याने नक्की किती परतावा मिळेल, हे सांगणे कठीण आहे. आता निवृत्तीपश्चात दिसणारी रक्कम मोठी असली, तरी महागाईमुळे पैशाच्या क्रयशक्तीत होणारा ऱ्हास लक्षात घेऊन आर्थिक नियोजन करणे महत्त्वाचे आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.