विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीचा ध्यास जपणारे शिक्षणतज्ज्ञ
esakal September 24, 2024 04:45 AM

विद्यार्थ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून, त्यांच्या आयुष्याला दिशा देणारे ध्येयनिष्ठ शिक्षक व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपसचिव एल. एम. पवार सर यांचा उद्या (मंगळवारी) सहस्त्रचंद्रदर्शनाचा सोहळा (वय ८१) आहे. त्यानिमित्त त्यांच्या कार्यावर टाकलेला दृष्टीक्षेप....
-------------------------------------------
विद्यार्थ्यांना तळमळीने शिकवणारे शिक्षक, सहाध्यायी शिक्षकांविषयी आत्मीयता बाळगणारे मुख्याध्यापक, शाळेची सर्वागिंण प्रगती व्हावी, यासाठी झटणारे उत्तम संघटक, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे निष्ठावंत अधिकारी अशी विविध रूपे एल. एम. पवार यांची आहेत. संयम व सचोटीने या विविध रूपात त्यांनी रंग भरले. आयुष्यभर त्यांनी विद्यार्थ्यांच्या आणि संस्थेच्या प्रगतीचा ध्यास घेतला. नियम व अटींचा बागुलबुवा उभा न करता, त्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना मदत करून, हजारो विद्यार्थ्यांचे आयुष्य त्यांनी उजळून टाकले आहे. विविध क्षेत्रात चमकणारे त्यांचे अनेक विद्यार्थी त्यांचे ऋण मान्य करून, त्यांच्याविषयी आदर व्यक्त करतात, हीच त्यांच्या कामाची पावती आहे. पांढरा शर्ट, तपकिरी पॅंट हा पेहराव आणि सदैव प्रसन्न व हसरा चेहरा ही पवार सर यांची वैशिष्ट्ये आहेत.
वाल्हे (ता. पुरंदर) येथील वागदरवाडी येथे पवार सरांचा जन्म झाला. त्यांचे वडीलही शिक्षक असल्याने शिक्षकीपेक्षाचे बाळकडू लहानपणीच त्यांना मिळाले होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नसरापूरमधील छत्रपती शिवाजी विद्यालय व पिरगुंटमधील न्यू इंग्लिश स्कूल येथे त्यांनी काही वर्षे उपशिक्षक म्हणून काम केले. त्यांच्यातील नेतृत्वाची चुणूक संस्थेच्या वरिष्ठांच्या लक्षात आली. त्यानंतर मुख्याध्यापक म्हणून त्यांना संधी देण्यात आली. पवार सर यांनी दिलेल्या संधीचे सोने केले. शिंद, नसरापूर (ता. भोर), मावडी क.प. (पुरंदर), शिरोली (ता. जुन्नर), खानापूर, शिवणे (ता, हवेली) वाणेवाडी (ता. बारामती), पौड (ता. मुळशी), मोशी, मुंढवा या दहा ठिकाणी त्यांनी मुख्याध्यापक म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटवला. मुंढवा येथील लोणकर माध्यमिक विद्यालयात त्यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम सुरू होता. संपूर्ण सभागृह भरून गेले होते. जिथे जागा मिळेल, तिथे अनेकजण बसले होते. बरेचजण उभे राहून सरांविषयीचा आदर व्यक्त करत होते. सरांविषयींच्या अनेक आठवणींना वक्ते उजाळा देत होते. सारे वातावरण भावूक झाले होते. अनेकांच्या डोळ्यांत पाणी तरळले होते. तेवढ्यात संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष प्रा. रामकृष्ण मोरे यांचा दूरध्वनी आला. ‘पवार सर सेवानिवृत्त होणार नाहीत तर उद्यापासून संस्थेच्या कारभारात लक्ष घालतील. त्यांच्यासारखा प्रामाणिक आणि ध्येयनिष्ठ माणसाची संस्थेला नितांत गरज आहे.’ प्रा. मोरे सर यांच्या या निर्णयाला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. तेव्हापासून आजतागायत तब्बल २१ वर्षे पवार सर संस्थेच्या कारभारात लक्ष घालत आहेत. संस्थेमधील शाळांची व विद्यार्थ्यांची प्रगती व्हावी, यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य वाहून घेतले आहे. आजही ८१ व्या वर्षीही त्यांचा कामातील उत्साह प्रचंड आहे. एखाद्याला तरुणाला लाजवेल असा कामाचा झपाटा आहे. नियमितपणे ते संस्थेच्या कार्यालयात जाऊन, विविध जबाबदाऱ्या ते यशस्वीरीत्या पेलत आहेत. त्यांच्याकडे बघून बाबा आमटे यांची कविता आठवते.
थांबला ना सूर्य कधी, थांबला ना वारा
धुंद या वादळाला कोठला किनारा
--------------------
फोटो ः ४८७२८

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.