Test Cricket : दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर, प्लेइंग ईलेव्हनमध्ये 2 बदल, या खेळाडूचं पदार्पण
GH News September 26, 2024 03:05 AM

सध्या 2 आशियाई संघ मायदेशात कसोटी मालिका खेळत आहे. टीम इंडिया बांगलादेश विरुद्ध 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. उभयसंघातील दुसरा आणि अंतिम सामना हा 27 सप्टेंबरपासून कानपूरमधील ग्रीन पार्क येथे होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला न्यूझीलंड श्रीलंका दौऱ्यात कसोटी मालिका खेळत आहे. न्यूझीलंड या 2 सामन्यांच्या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. उभयसंघातील दुसरा आणि अंतिम सामना हा 26 सप्टेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. या दुसऱ्या सामन्यासाठी श्रीलंकेने एक दिवसआधीच प्लेइंग ईलेव्हन जाहीर केली आहे.

श्रीलंकेने दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत. विश्वा फर्नांडो याला दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकावं लागलं आहे. त्यामुळे विश्वाच्या जागी संघात युवा निशान पेरिस याचा समावेश करण्यात आला आहे. त्याच निशानला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. मात्र निशानला रमेश मेंडीस याच्या जागी स्थान देण्यात आलं आहे. निशान यासह न्यूझीलंड विरुद्ध कसोटी पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. निशाने 41 फर्स्ट क्लास मॅचेसमध्ये 172 विकेट्स घेतल्या आहेत.

तसेच लहीरु कुमारा याच्या जागी मिलन रथनायके याचा समावेश करण्यात आला आहे. कुमाराला पहिल्या सामन्यात एकही विकेट घेता आली नाही. तर इंग्लंड दौऱ्यात पदार्पण करणाऱ्या मिलनने आतापर्यंत 10 विकेट्स घेतल्या आहेत. मिलनने पदार्पणात 72 धावांची खेळी केली होती.

श्रीलंकेची प्लेइंग ईलेव्हन

श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : धनंजया डी सिल्वा (कर्णधार), पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, दिनेश चंडिमल, अँजेलो मॅथ्यूज, कामिंदू मेंडिस, कुसल मेंडीस (विकेटकीपर), मिलन प्रियनाथ रथनायके, प्रभात जयसूर्या, निशान पेरिस आणि असिथा फर्नांडो.

कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंड संघ : टीम साऊथी (कॅप्टन), टॉम लॅथम, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, एजाज पटेल, विल्यम ओर्रुके, मायकेल ब्रेसवेल, विल यंग, ​​मॅट हेन्री आणि बेन सियर्स.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.