Fashion Tips : तीन प्रकारच्या कापडांपासून बनणाऱ्या महेश्वरी साड्या
Marathi September 26, 2024 03:24 AM

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी इंदौर येथील मृगनयनी एम्पोरियम येथून महेश्वरी आणि चंदेरी साड्यांची खरेदी केली आणि यूपीआयच्या माध्यमातून त्याचं पेमेंट केलं. मध्यप्रदेशाच्या खरगोन जिल्ह्यातील या महेश्वरी साड्यांचा इतिहास जवळपास 250 वर्षे जुना आहे. होळकर राजवंशातील देवी अहिल्याबाई होळकर यांनी महेश्वर येथे सन 1767 मध्ये एक कुटीरोद्योग स्थापन केला होता.

गुजरात, हैदराबाद आणि भारतातील काही अन्य शहरांतील विणकाम करणाऱ्या परिवारांना त्यांनी एकत्र आणलं. त्यांना घर, व्यापार या सर्व सुविधा पुरवल्या. इथे आधी केवळ सुती साड्या बनवल्या जायच्या. पण त्यानंतर उच्च गुणवत्ता असणारी रेशमी किंवा सोने-चांदी यांच्या तारांपासून साड्या बनवल्या जाऊ लागल्या.

महेश्वरी साड्यांची खासियत ही आहे की या साड्यांवर किल्ल्यांचे नक्षीकाम केले जाते. महेश्वरी साड्यांमध्ये एक रेशमी धागा जर जळला तर त्याची राख होऊन जाते. साडी विणत असताना शुद्ध सुती, रेशमी आणि जरीचा वापर केला जातो. साड्या 54, 56, 58 आणि 60 अशा धाग्यांमध्ये उपलब्ध असतात.

चंदेरी साड्यांमध्ये तीन प्रकारची कपडे :

मध्यप्रदेशातील अशोकनगर जिल्ह्यामध्ये चंदेरी कपड्यांचा इतिहास वैदिक युगांमध्ये मिळतो. सध्या चंदेरीमध्ये तीन फॅब्रिक तयार केले जात आहेत. यामध्ये प्युअर सिल्क, चंदेरी कॉटन आणि सिल्क कॉटन यांचा समावेश आहे.

तसं पाहायला गेल्यास बारीक जरीची किनार असणाऱ्या चंदेरी साड्यांची एक खास ओळख आहे. या बारीक जरी चांदीच्या धाग्यांपासून बनलेल्या असतात तर त्यांना सोन्याचा मुलामा दिलेला असतो. या साड्या बनवण्याची सुरूवात धाग्यांना रंग देण्यापासून होते. त्यानंतर हातांनीच फुलं बनवली जातात. चंदेरी साडीमध्ये नलकर्फा, डंडीदार, चटई, जंगला आणि मेहंदी वाले हात हे काही पॅटर्न्स प्रसिद्ध आहेत.

हेही वाचा : Navratri 2024 Colours : नवरात्रीचे नऊ दिवस या 9 रंगाचे कपडे करा परिधान


संपादन- तन्वी गुंडये

 

 

 

 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.