हॉकीतला नवा जादूगार
esakal September 29, 2024 08:45 AM

शैलेश नागवेकर

मेजर ध्यानचंद यांची परंपरा असलेल्या भारतीय हॉकीचा झेंडा या आधुनिक युगात हरमनप्रीतसिंग सन्मानानं उंचावत आहे. एकापेक्षा एक दिग्गज खेळाडूंनी भारतीय हॉकीचा सन्मान वाढवला. हिरवळीवरची हॉकी मॅटवर आल्यानंतर स्थित्यंतर घडले आणि भारतीय हॉकीचा दरारा युरोपियन संघांच्या तुलनेत काहीसा मागं पडला, हा भूतकाळ असला तरी सलग दोन ऑलिंपिक स्पर्धांमध्ये ब्राँझपदक जिंकणं हे वास्तव पुन्हा एकदा हॉकीचे युग निर्माण होण्यास पोषक आहे.

मुळात हा खेळ पूर्णतः सांघिक! एखादा अचूक पास कमाल घडवतो किंवा हुकलेला पास होत्याचे नव्हत करतो म्हणून मैदानावर असलेले ११ पैकी ११ खेळाडू तेवढेच महत्त्वाचे. तरीही एखादा खेळाडू स्वतःच्या अलौकिकतेच्या जोरावर कसे भाग्य बदलू शकतो हे नुकताच निवृत्त झालेला गोलरक्षक श्रीजेशने दाखवून दिले आणि सिद्धही केले.

क्रिकेटमध्ये राहुल द्रविडला भले दी वॉल म्हणून संबोधले जायचे पण प्रतिस्पर्धी संघाचा गोल होऊ न देण्यासाठी पूर्ण गोलजाळ्याचे संरक्षण करणाऱ्या श्रीजेशची भिंत अभेद्य अशीच होती. पण या श्रीजेशह सर्व संघाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर समर्थपणे पेलून भारतीय हॉकीला पुन्हा नावारूपास आणणारा हरमनप्रीत भारतीय क्रीडा क्षेत्राचाही नायक आहे. विश्वकरंडक क्रिकेट विजेता रोहित शर्मा किंवा सुपरस्टार विराट कोहली असो किंवा सलग दोन ऑलिंपिक पदके जिंकणारा नीरज चोप्रा असो, हरमनप्रीतही तेवढ्याच उंचीवर आहे.

एक काळ असा होता, की भारतीय हॉकीसमोर कोणाचेच आव्हान टिकत नव्हते पण परिस्थिती बदलल्यानंतर भारतीय हॉकीला स्वतःचे स्थान टिकवण्यासाठी झुंजावे लागत होते. अशा स्थितीत २०२० मधील टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत तब्बल ४१ वर्षांनी भारताला हॉकीचे पदक जिंकून देणाऱ्या संघाचा हरमनप्रीतसिंग प्रमुख शिलेदार होता. याच यशाची पुनरावृत्ती यंदाच्या पॅरिस ऑलिंपिकमध्ये त्याने कर्णधारपदाच्या जबाबदारीतून केली. ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, जर्मनी, नेदरलँड अशा हॉकीतील बलाढ्य संघांसमोर असे सातत्य ठेवणे सोपे नाही.

या ब्राँझपदकाचा रंग नुकत्याच झालेल्या आशियाई चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत सोनेरी करून हरमनप्रीतने आपला दरारा दाखवून दिला. मैदानावरील गुणवत्तेचा आणि क्षमतेचा असाच दरारा असल्यामुळे त्याला सन्मानाने सरपंच म्हणून संबोधले जाते. ऑलिंपिक पदकविजेत्या खेळाडूंच्या सन्मान सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरमनप्रीतला सरपंच म्हणून संबोधले यावरून त्याची कीर्ती सर्वत्र पसरल्याचे अधोरेखित झाले.

ऑलिंपिकमध्ये ब्राँझपदकाचे सुवर्णपदक झाले नाही. उपांत्य फेरीचा सामना थोडक्यात गमावला अन्यथा सुवर्णपदकासाठी लढण्याच्या उंबरठ्यापर्यंत आपला हॉकी संघ पोहोचला होता. शेवटी पदकाच्या शर्यतीत इतर घटकही महत्त्वाचे ठरत असतात. विनेश फोगाटचे १०० ग्रॅमचे वाढलेले वजन किंवा मीराबाई चानूकडून १ किलोचे वजन उचलण्याची असमर्थता यामुळे हाताशी आलेले पदक निसटू शकते. मात्र जागतिक हॉकीत भारताने आता दरारा निर्माण केलाय, हे सत्य आहे.

यंदाच्या पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत सर्वाधिक १० गोल करणारा हरमनप्रीत आहे हे लक्षात घ्यावे लागेल. सध्याच्या जागतिक हॉकीत सर्वोत्तम ड्रॅगफ्लिकर आणि पेनल्टी कॉर्नरवर हमखास करणारा एकमेव खेळाडू म्हणून हरमनप्रीतची मक्तेदारी आहे. पेनल्टी कॉर्नरवर चेंडू अडवून अत्यंत वेगात तो गोलजाळ्यात मारतो, तेव्हा त्याच्या हातातील आणि मनगटातील ताकदीचा अंदाज येतो.

पेनल्टी कॉर्नरचा बादशाह

२०२० च्या टोकियो ऑलिंपिकमध्ये सलामीला न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पेनल्टी कॉर्नरवर दोन गोल करून हरमनप्रीतने भारताची मोहीम सुरू केली होती. बाद फेरीतही त्याचा धडाका कायम होता. पुढे बेल्जियमविरुद्ध गोल करूनही भारताचा पराभव झाला आणि अंतिम फेरीची संधी हुकली होती. पण याच हरमनप्रीतने जर्मनीविरुद्ध गोल केला आणि भारताला ४१ वर्षांनंतर ब्राँझपदक जिंकता आले होते. त्या स्पर्धेत सहा गोल करून हरमनप्रीत भारताकडून सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला होता. यंदाच्या ऑलिंपिकमध्ये एक नव्हे दहा पाऊल पुढे टाकत त्याने सर्वाधिक १० गोल केले. निर्णायक सामन्यात पेनल्टी कॉर्नवर केलेल्या गोलांमुळे भारताला पुन्हा ब्राँझपदक जिंकता आले.

हरमनप्रीतचा जन्म ६ जानेवारी १९९६ चा. अमृतसरमधील जांदियालामध्ये शेतकरी कुटुंबात जन्म झाल्यामुळे ट्रॅक्टरशी जवळचा संबंध आलाच. लहानपणी ट्रॅक्टरचा गिअर त्याला हॉकी स्टीक वाटू लागली होती. वडिलांसह ट्रॅक्टरवर असताना अवघड गिअर हलवताना हातातील ताकद वाढू लागली आणि पेनल्टी स्ट्रोकवर ड्रॅग फ्लिग करण्यासाठी लागणारी ताकद आपोआप हातामध्ये येत गेली.

२०११ मध्ये जालंधर येथील सुरजित अकादमीत तो दाखल झाला आणि गगनप्रीतसिंग व सुखजितसिंग यांच्याकडून त्याने धडे गिरवले. योगायोग असा की गगनप्रीत आणि सुखजित हे दोघेही पेनल्टी कॉर्नर स्पेशालिस्ट होते. ज्युनियर गटात असतानाच त्याच्या हातातील ताकद अनेकांना जाणवू लागली होती.

२०११ मधील सुलतान जोहर करंडक ज्युनियर हॉकी स्पर्धेत हरमनप्रीतने पदार्पण केले आणि आपला गोलधडाका सुरू केला. तीन वर्षांनंतर तो याच स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडू ठरला. २०१४ मधील स्पर्धेत त्याने सर्वाधिक नऊ गोल केले होते. लगेचच पुढच्या वर्षी हरमनप्रीतला सीनियर भारतीय संघाचे दरवाजे उघडले. जपानविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याची निवड झाली.

२०१५ मध्ये ज्युनियर आशिया करंडक स्पर्धेत हरमनप्रीतने १४ गोलांचा वर्षाव केला होता. सुलतान अझलान शाह करंडक स्पर्धेतही गोल केल्यानंतर त्याची रिओ ऑलिंपिक स्पर्धेसाठी निवड झाली होती, परंतु या ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय संघानेच निराशा केल्यामुळे हरमनप्रीतला संघातून वगळण्यात आले होते, परंतु २०१६ मधील ज्युनियर विश्वकरंडक स्पर्धेत भारताने विजेतेपद मिळवले. त्यात हरमनप्रीतने तीन गोल केले. त्यामुळे तो पुन्हा सीनियर संघात येऊ शकला. हळूहळू त्याने जम बसवला, दराराही निर्माण केला आणि आता त्याच्या नावावर गोलांचे द्विशतक आहे. म्हणूनच तो सरपंच या गौरवाने तो ओळखला जात आहे.

हरमनप्रीतची भरारी
  • २०२० पॅरिस ऑलिंपिकमध्ये ब्राँझपदक या स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक गोल

  • २०२१-२२ मधील प्रो हॉकी लीगमध्ये सर्वाधिक गोल

  • २०२३ मधील विश्वकरंडक हॉकी स्पर्धेत भारताचे नेतृत्व

  • २०२२ बर्मिंगहॅमधील राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक

  • २०२३ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे नेतृत्व आणि सुवर्णपदक स्पर्धेत सर्वाधिक १३ गोल

  • २०२३ मधील आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत नेतृत्व आणि सुवर्णपद

  • २०२४ पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत कर्णधार आणि ब्राँझपदक

  • २०२४ आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कर्णधापद आणि सुवर्णपदक

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.