लक्ष्मण हाके-मराठा आंदोलक पुण्यातील रस्त्यावर भिडले; हाकेंनी दारू प्यायल्याचा आंदोलकांचा दावा, मेडिकल टेस्ट करण्याचीही मागणी
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे October 01, 2024 01:13 AM

पुणे : ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलक यांच्यात पुण्यात वाद झाल्याची घटना घडली आहे. पुण्यातील कात्रज-कोंढवा रस्त्यावर लक्ष्मण हाके आले असता हा वाद झाला. लक्ष्मण हाके यांनी दारु प्यायली असल्याचा मराठा आंदोलकांनी दावा केला. तर मराठा आंदोलकांनी जाणीवपूर्वक हल्ला केल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला. या प्रकरणी लक्ष्मण हाकेंची मेडिकल चाचणी करावी अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली. 

यासंबंधित एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी दिसतात. त्यामध्ये लक्ष्मण हाके यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी धरल्याचं दिसून येतंय. या वादानंतर दोन्ही बाजूचे लोक कोंढवा पोलिस ठाण्यात पोहचले असून एकमेकांच्या विरोधात तक्रार दाखल करणे सुरु आहे. लक्ष्मण हाके यांची मेडिकल टेस्ट करण्याची मराठा आंदोलकांनी मागणी केली आहे. तर मराठा आंदोलकांनी आपल्यावर जाणीवपूर्वक हल्ला केल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला. 

लक्ष्मण हाकेंनी दारू प्यायल्याचा दावा

ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलकांमध्ये कोंढवा-कात्रज रस्त्यावर हा वाद झाला. लक्ष्मण हाके यांनी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यावर मराठा आंदोलकांनी आक्षेप घेतला. त्यावेळी लक्ष्मण हाके यांनी दारू प्यायल्याचा आरोपही आंदोलकांनी केला. 

नंतर हा वाद वाढत गेला आणि प्रकरण पुण्यातील कोंढवा पोलिसांमध्ये गेलं. लक्ष्मण हाके यांनी दारू प्यायली असून त्यांची मेडिकल टेस्ट करावी अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली. तर आपल्याला बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक आरोप केला जात असल्याचं हाके यांनी म्हटलं. नंतर दोन्ही बाजूंकडून मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी कोंढवा पोलिस ठाण्यात झाली. 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.