'जीवे मारण्याचा प्रयत्न?' हाकेंचा दावा, ससूण रुग्णालयासमोर मध्यरात्री मराठा ओबीसी कार्यकर्त्यांचा गोंधळ
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे October 01, 2024 09:43 AM

Pune: ओबीसी नेते लक्ष्मण हाके मद्यप्राशन करताना आढळले असल्याचा आरोप मराठा कार्यकर्त्यांनी केला असून मद्यपानाची चाचणी करण्यासाठी पुण्यातील ससूण रुग्णालयात गेले असता सोमवारी रात्री मराठा व ओबीसी समाजाचे कार्यकर्ते रुग्णालयासमोरच आमने सामने आले होते. कार्यकर्त्यांनी मोठा गहजब केल्याचे समोर आले. या घटनेनंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलकांकडून पोलिसांना परस्पर तक्रारी देण्यात आल्या होत्या. यावर पोलिसांनी कारवाई करत 20 ते 25 मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. हा पूर्वनियोजित गट असून आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न असल्याचा दावा हाकेंनी केला आहे. 

राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी वारंवार एकमेकांच्या समोर येत असल्याचे चित्र असून सोमवारी मध्यरात्री पुण्यातील ससून रुग्णालयासमोर मराठा व ओबीसी कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातल्याचे समोर आले. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दारूच्या नशेत मराठा कार्यकर्त्यांना शिवीगाळ केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे. 

लक्ष्मण हाकेंना जीवे मारण्याचा प्रयत्न?

लक्ष्मण हाके यांच्या घरापासून 500 ते हजार मीटर अंतरावर असताना दोन इसम हाके यांच्या जवळ आले. 'सुरुवातीला जुजबी संवाद साधला. नंतर खाली उतरताच पाच ते सहा चार चाकी येऊन मला पकडले. हात आणि मान पकडत मला जिवे मारण्याचा प्रयत्न' केल्याचं लक्ष्मण हाके यांनी माध्यमांना सांगितले. मध्य प्राशन करत नसेल तर मराठा कार्यकर्त्यांना शिवीगाळ केल्याचा आंदोलकांचा आरोप आहे. 

लक्ष्मण हाके व मराठा आंदोलकांकडून पोलिसांना परस्पर तक्रारी 

पुण्यातील कोंढवा भागात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मद्यपान केल्याचा आरोप मराठा कार्यकर्त्यांनी केला असून याबाबतचा व्हिडिओ ही समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. दारूच्या नशेत हाके यांनी मराठा कार्यकर्त्यांना शिवीगाळ केली असल्याचा आरोप मराठा कार्यकर्त्यांनी केला असून ससून रुग्णालयासमोर मराठा ओबीसी कार्यकर्ते पुन्हा एकदा आमने-सामने आल्याचे चित्र होते. मद्यपानाच्या आरोपावरून लक्ष्मण हाके व मराठा कार्यकर्त्यांनी परस्पर कोंडवा पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्याचे समजते. 

 20 ते 22 मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल 

सोमवारी मध्यरात्री ससून रुग्णालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत मराठा कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याचे चित्र होते. याबाबत लक्ष्मण हाके यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी 20 ते 22 मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल केला आहे. ओबीसी आंदोलन लक्ष्मण हाके यांच्या तक्रारीवरून हा पूर्वनियोजित कट असून मला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा त्यांनी आरोप केलाय. 

लक्ष्मण हाके यांनी मद्यपान केले की नाही?

मद्यपानाचा मुद्द्यावरून झालेल्या या वादानंतर ओबीसी आंदोलन लक्ष्मण हाके यांची ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली. प्राथमिक अहवाला त्यांनी दारू पिलेली नव्हती असा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला असून पुन्हा खात्री करण्यासाठी लक्ष्मण हाके यांच्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत. या चाचणीचा अहवाल घेण्यासाठी आणखी एक दोन दिवस लागू शकतात.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.