Chhatrapati Shivaji Maharaj big statement by Sheikh Subhan Ali PPK
Marathi October 01, 2024 07:24 PM


नागपूर : नागपुरात काँग्रेस पक्षाचे नेते आणि विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार मोतीराम मोहाडीकर यांच्या समर्थनार्थ सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत दंगल मुक्त महाराष्ट्र या संघटनेचे संयोजक शेख सुभान अली हे सुद्धा उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानांमुळे आणि दिलेल्या माहितीमुळे काहीसा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या सभेत त्यांनी दावा केला की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही मुसलमान मावळ्यांवर होती, मग शिवाजी महाराज मुसलमानांचे शत्रू होते, असे का बिंबविले गेले?. पण त्यांनी दिलेल्या या माहितीवर शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी सुद्धा स्पष्टीकरण दिले आहे. (Chhatrapati Shivaji Maharaj big statement by Sheikh Subhan Ali)

नागपुरातील सभेत दंगल मुक्त महाराष्ट्र या संघटनेचे संयोजक शेख सुभान अली म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे 31 सुरक्षारक्षक होते. त्यापैकी 20 सुरक्षारक्षक मुस्लीम होते. म्हणजेच शिवाजी महाराज यांनी स्वतःच्या सुरक्षेची जबाबदारी मुस्लीम मावळ्यांना दिली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात सव्वा लाख सैन्य होते. त्याचा कमांडर नुर खान बेग हा मुसलमान होता. शिवाजी महाराजांचा गनिमीकावा ज्या घोडदलावर अवलंबित होता, त्या घोडदलाचा कमांडर सिद्धी हिलाल हा देखील मुस्लीम होता आणि त्या घोडदलात 58 हजार घोडसवार देखील मुस्लीम होते.

– Advertisement –

हेही वाचा… Maratha Reservation : मनोज जरांगेची दसरा मेळाव्याची घोषणा; मराठा समाज, शेतकऱ्यांना नारायण गडावर येण्याचे आवाहन  

तसेच, महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख एक मुसलमान इब्राहिम खान होता. तर छत्रपतींचा कायदेशीर सल्लागार व खासगी सचिव मौलाना काझी हैदर हा ही मुसलमान होता. त्याच काझी हैदरला शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा पहिला सरन्यायाधीश बनवले होते. महत्त्वाचे म्हणजे तुकाराम महाराज आणि जिजाऊ यांच्या व्यतिरिक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचे इतर ही काही गुरु होते, असे सांगते ते म्हणाले की, रत्नागिरी येथील संत याकुत बाबा या मुस्लिम संतांना शिवाजी महाराज यांनी त्यांचे गुरु मानले होते, असा दावा शेख सुभान अली यांनी केला.

– Advertisement –

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुरुबाबत माहिती देताना शेख सुभान अली यांनी सांगितले की, रत्नागिरी येथील संत याकुत बाबा या मुस्लिम संतांना शिवाजी महाराज यांनी त्यांचे गुरु मानले होते. नंतरच्या काळात तिथे मशिदीसाठी महाराजांनी याकुत बाबांना 653 एकर जागा ही दिली होती. एवढे सर्व असताना शिवाजी महाराज मुसमानांचे शत्रू होते, असे का बिंबविले गेले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पण त्यांनी केलेल्या या दाव्यावर आणि त्यांच्या सवालावर आमदार संजय गायकवाड यांनी उत्तर देत मत व्यक्त केले आहे.

काय म्हणाले संजय गायकवाड?

दंगल मुक्त महाराष्ट्र या संघटनेचे संयोजक शेख सुभान अली केलेल्या वक्तव्यावर आपले मत व्यक्त करताना आमदार संजय गायकवाड म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारात अनेक मुसलमान होते. पण शिवाजी महाराजांनी कधीही त्यांना मुसलमान म्हणून ठेवले नाही, कारण ती स्वराज्याची लढाई होती. हे खरे आहे की, त्याकाळी मनुवादी प्रवृत्तीला विचारल्याशिवाय समुद्रात प्रवेश करता येत नव्हता. मात्र शिवाजी महाराजांनी सगळे निर्बंध धुडकावून समुद्रात प्रवेश केला. त्यांच्यासोबत काही प्रमाणात मुसलमान मावळे देखील होते. पण 100 टक्के मुसलमान होते, असे नाही. याकुत बाबांना छत्रपती शिवाजी महाराज मानायचे. त्यामुळेच त्यांना त्याकाळी शिवाजी महाराजांनी मोठी जमीन देखील दिली हे खरे आहे, असे गायकवाड यांच्याकडून सांगण्यात आले.


Edited By Poonam Khadtale



Source link

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.