आजारी लेकरांना घेत पालक थेट सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ; मुलांना फुटपाथवर ठेवत पालकांचे आंदोलन
सूरज सावंत October 02, 2024 02:13 PM

मुंबई : SSPE आजाराने त्रस्त असलेली मुलांना घेत हतबल पालक आज थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी थेट सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचले. यावेळी मुख्यमंत्र्यांची भेट होत नसल्याने पालकांनी आक्रमक पवित्रा घेत फुटपाथवर आंदोलनाला सुरुवात केली. मुलांना लस मिळत नसल्याने मुल आजारी पडत असल्याचे पालक म्हणाले. आजारी मुलं थेट रस्त्यावर आल्याने अनेक पालकांना अश्रु अनावर झाले. आम्हाला पैसे नको तर सुदृढ आरोग्य द्या, त्यामुळे मुलांना पदपथावर ठेवत पालकांनी आंदोलन केले. 

धावणारा मुलगा जागेवर थांबला आहे

पालक उर्मिला चव्हाण म्हणाल्या की, माझ्या मुलाचे नाव देवांश चौहान आहे. आज मुलगा बेडवर बसून आहे. एकाकी तो आजारी पडला, त्याला  बोलता येत नाही, शरीर वाकडं झालं आहे. एसएसपीई हा आजार झाला आहे. अचानक ताप आला व आकडी आली. रुग्णालयात गेलो तर डोक्यात ताप गेल्याचे सांगितले. त्याला रुग्णालयात दाखल केले होते. सर्व चाचणी केल्या पण आजार कळला नाही. मुख्यमंत्र्यांना भेटायला आलो आहे. धावणारा मुलगा जागेवर थांबला आहे. आमच्या मुलावर उपचार करा एवढीच मागणी आहे. सरकारने लक्ष द्यावे, या आजाराने दीड ते दोन हजार मुले आहेत. 

आमच्याकडे औषधांसाठी पैसे नाही

जया बेलकर, म्हणाल्या की, सातवीत असलेला मुलगा अचानक जागेवर बसला, वाडीया रुग्णालयात उपचार केले. त्याला एसएसपीई आजार झाल्याचे स्पष्ट झाले. आमच्याकडे औषधांसाठी पैसे नाही. महिन्याला 25 ते 30  हजार रुपये खर्च आहे. सरकारने रिसर्च करून लवकर औषध शोधावे एवढीच मागणी आहे. 

सरकार म्हणजे विषकन्या, नितीन गडकरींचा मिश्किल टोला

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सरकार विषकन्या असल्याचे उपरोधिकपणे म्हटले होते. सरकार ज्याच्या सोबत जाईल त्याला बुडवते, असेही ते म्हणाले होते. विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलच्या वतीने आयोजित केलेल्या "अमेझिंग विदर्भ, सेंट्रल इंडिया टुरिझम" या सेमिनारमध्ये ते बोलत होते. गडकरी म्हणाले की, विदर्भात चांगले आणि मोठ्या प्रमाणात जंगल आहे. मात्र, विदर्भात पर्यटन वाढीसाठी प्रमुख समस्या म्हणजे विदर्भातील गुंतवणूकदार आहेत. गुंतवणूक करण्यासाठी हे गुंतवणूकदार समोर येत नाही. व्यावसायिकांनी हे समजून घेतले पाहिजे की, सर्व काही सरकारच्या भरवशावर होत नाही. तर काही वेळेस सरकारला दूर ठेवावे लागतं, असेही गडकरी यावेळी म्हणाले. सरकार विषकन्या आहे, ती ज्याच्या सोबत जाईल त्याला बुडवतेच, असा मिश्किल टोलाही गडकरींनी यावेळी लगावला. तुम्ही या सर्व लफड्यात पडू नका, ही सबसिडी घ्यायची आहे ती घ्या तसेच ती केव्हा मिळेल याचं काही भरवसा नाही. आता तर लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे. त्यामुळे सबसिडीचा निधी त्यांना तिकडेही लागेल असेही गडकरी मिश्किलपणे म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.