शिक्षकाने पत्नीचा डोक्यात वरवंटा घालून केला निर्घृण खून; डोक्यात वर्मी घाव, शिक्षिका रक्ताच्या थारोळ्यात पडल्या अन्...
esakal October 02, 2024 03:45 PM

सुशिक्षित असणाऱ्या लोकरे कुटुंबातील मुलगी अपूर्वा सेट उत्तीर्ण आहे. त्यांच्या मुलाची भारतीय नौदलात निवड झाली आहे.

मुरगूड : येथे मंगळवारी एका शिक्षकाने शिक्षिका असलेल्या आपल्या पत्नीचा डोक्यात वरवंटा घालून निर्घृण खून केला. हा प्रकार सकाळी साडेनऊच्या सुमारास घडला. सविता परशराम लोकरे (वय ४५) असे मृत महिलेचे नाव आहे. मुरगूड पोलिसांनी (Murgud Police) या प्रकरणी परशराम पांडुरंग लोकरे (५३) याला अटक केली. कौटुंबिक वादातून हा प्रकार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : पोलिस ठाण्यापासून अगदी काही अंतरावरच साई कॉलनी आहे. तेथे अपूर्वाई बंगल्यात लोकरे दांपत्य दोन मुली व एका मुलग्यासह राहतात. परशराम व सविता यांच्यात कौटुंबिक कारणातून वारंवार वाद होत होते. यातून परशरामने सविता यांना मारहाण देखील केली होती.

Sangameshwar Crime : संगमेश्वरमध्ये वसतिगृहातील अल्पवयीन मुलींसोबत अश्लील वर्तन; 'या' ऑडिओमुळे प्रकार आला समोर

मंगळवारी सकाळी चहापान सुरू असतानाच पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाला. तो वाढतच जाऊन विकोपाला गेला. या दरम्यान त्या भांडी घासण्यासाठी गेल्या. परशरामने रागाच्या भरात हातात वरवंटा घेऊन धावत जात सविता यांच्या डोक्यात घातला. डोक्यात वर्मी घाव बसल्यामुळे सविता रक्ताच्या थारोळ्यात पडल्या व जागीच ठार झाल्या. हा प्रकार समजताच पोलिस उपनिरीक्षक शिवाजी करे यांनी सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली व परशरामला अटक केली.

भोस्ते घाटातील 'त्या' मृतदेहाचा उलगडा, पण स्वप्न सांगणारा योगेश आर्याच गायब, काय आहे प्रकरण?

याबाबतची फिर्याद मुलगी अपूर्वा (२५) हिने दिली. दरम्यान, अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई यांनी घटनास्थळी भेट देत तपासाबाबत सूचना दिल्या. सविता यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुरगूड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. त्यानंतर सायंकाळी त्यांच्यांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या पथकाने घटनास्थळी भेट देत नमुने घेतले.

उच्चशिक्षित कुटुंब

सुशिक्षित असणाऱ्या लोकरे कुटुंबातील मुलगी अपूर्वा सेट उत्तीर्ण आहे. त्यांच्या मुलाची भारतीय नौदलात निवड झाली आहे. या दोघांच्याही अभिनंदनाचे डिजिटल फलक कॉलनीच्या प्रवेशद्वारावर गेल्या आठवड्यात लावण्यात आलेले आहेत. मुलांच्या कौतुकाप्रीत्यर्थ सविता यांनी चार दिवसांपूर्वीच सर्वांना स्नेहभोजन देऊन आनंद द्विगुणीत केला होता.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.