मुख्यमंत्र्यांचे विमान उतरणार सोलापूर विमानतळावर! वचनपूर्ती सोहळ्यादिवशी शहरातील 'हे' मुख्य रस्ते राहणार बंद; लाभार्थी महिलांना घेवून आलेल्या बस 'येथे' थांबणार
esakal October 05, 2024 02:45 PM

सोलापूर : सोलापुरातील होम मैदानावर मंगळवारी (ता. ८) दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा होणार आहे. त्यासाठी ११ तालुक्यांमधून ४५० बसगाड्यांमधून ३५ ते ४० हजार लाभार्थी सोलापुरात आणले जाणार आहेत. त्यावेळी सर्व बस छत्रपती शिवाजी महाराज चौकातून डफरीन चौक, पार्क चौक (चार हुतात्मा पुतळ्याजवळ) व पासपोर्ट कार्यालयाजवळ येतील. लाभार्थी उतरल्यानंतर त्या सर्व बस नेमून दिलेल्या पार्किंगच्या ठिकाणी जातील. तत्पूर्वी, शहरातील प्रमुख दोन मार्ग सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवले जाणार आहेत.

सोलापूर शहराजवळील तालुक्यांना विशेषत: मोहोळ, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर या तालुक्यांना प्रत्येकी पाच हजार तर बार्शी, माळशिरस, मंगळवेढा, सांगोला, करमाळा या तालुक्यांसाठी प्रत्येकी दीड ते दोन हजार महिला लाभार्थींना घेऊन येण्याचे टार्गेट देण्यात आले आहे. लाभार्थींना आणायला प्रत्येक तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये बसगाड्या जाणार असून, त्या गावांची यादी तयार करून जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून एसटी महामंडळाला देण्यात आली आहे.

प्रत्येक बसमध्ये अंगणवाडी सेविका, आशा सेविका, तलाठी असतील. त्या लाभार्थींना पुन्हा त्याच बसमधून त्यांच्या गावी सोडले जाणार असल्याने प्रत्येकाचे मोबाईल क्रमांकही घेण्यात आले आहेत. पण, त्या गर्दीत एखाद्या महिला लाभार्थीचा कॉल नाही लागला तर ती गाडी लाभार्थी येईपर्यंत तेथेच थांबवून ठेवावी लागणार आहे. दरम्यान, लाभार्थींना घेऊन येणाऱ्या बसगाड्या शहरातील कोणत्या मार्गांवरून कार्यक्रमाच्या ठिकाणी आणायच्या, त्या गाड्यांचे पार्किंग कोठे असणार, याची पाहणी शुक्रवारी (ता. ४) वाहतूक पोलिस, एसटी महामंडळाचे अधिकारी व महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केली आहे.

मंत्र्याचे विमान उतरणार सोलापूर विमानतळावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेले विमानतळ मार्ग निश्चित न झाल्याने बंदच आहे. पण, उद्घाटन झाल्यापासून पहिल्यांदाच विमानतळावर ८ ऑक्टोबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे विमान उतरण्याची शक्यता आहे. तिन्ही मंत्री हेलिकॉप्टर की विमानाने येणार आहेत, हे अजून निश्चित झाले नाही. पण, विमान उतरण्यासाठी व उड्डाणासाठी विमानतळ सज्ज असल्याचे विमानतळाचे अधिकारी बानोत चांपला यांनी सांगितले.

बसमधून लाभार्थी उतरविण्याचे अन् बसगाड्या पार्किंगचे नियोजन

  • १) डफरीन चौक

  • २) पार्क चौक (चार हुतात्मा पुतळ्याजवळ)

  • ३) मार्केट चौकी परिसर, पासपोर्ट कार्यालयासमोर

---------------------------------------------------------------------------------

बस पार्किंगची ठिकाणे

  • १) चार पुतळ्याजवळ प्रवासी उतरविलेल्या बस : जुनी मिल कंपाउंड व करजगी मैदान

  • २) डफरीन चौकात प्रवासी उतरविलेल्या बस : एक्झिबिशन मैदान व भंडारी ग्राउंड

  • ३) पासपोर्ट कार्यालयाजवळ प्रवासी उतरविणाऱ्या बस : कर्णिक मैदान, कुचन प्रशालेचे मैदान व वल्याळ मैदान

‘हे’ रस्ते सकाळी आठपासूनच राहणार

  • नवीवेस पोलिस चौकी ते जुना एम्प्लॉयमेंट चौक

  • रामलाल चौक ते पासपोर्ट कार्यालय

  • सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत हे रस्ते बंद राहतील, पण दुपारी १२ नंतर कार्यक्रम संपेपर्यंत हे रस्ते तात्पुरते खुले ठेवण्याचेही नियोजन

पोलिस आयुक्त, उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन

मंगळवारी (ता. ८) सोलापूर शहरातील होम मैदानावर वचनपूर्ती सोहळा पार पडणार असून त्याचे वाहतूक नियोजन करण्यात आले आहे. पोलिस आयुक्त, उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातून लाभार्थींना घेवून येणाऱ्या बसगाड्यांचे मार्ग, थांबण्याची ठिकाणे, बस पार्किंगची सोय, याची संपूर्ण तयारी झाली आहे. त्यासाठी शहरातील काही मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली जाणार असून त्यासंबंधीचे आदेश लवकरच काढले जातील.

- सुधीर खिराडकर, सहायक पोलिस आयुक्त (वाहतूक), सोलापूर शहर

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.