Rahul Gandhi : शिवरायांच्या विचारातूनच संविधान निर्मिती.. राहुल गांधींनी केलं छत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण, मोदींवर केली जोरदार टीका
esakal October 05, 2024 08:45 PM

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. यादरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी आज कसबा बावडा येथील भगवा चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राहुल गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संविधान याबद्दल मोठं विधान केले आहे.

राहुल गांधी म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराजांची ही फक्त एक मूर्ती नाहीये, तेव्हा मूर्ती तयार केली जाते, जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या विचारधारेला, त्यांच्या कर्मांना मनापासून स्वीकारतो. कोणी मुर्तीचे अनावरण केले आणि जीवनभर ते ज्या गोष्टींसाठी लढले त्यांच्यासाठी आपण लढलो नाही तर मूर्तीचा काही अर्थ उरत नाही. जेव्हा आपण या मूर्तीचे अनावरण करतो, तेव्हा आपण हे वचन देखील घेतो की ज्या पद्धतीने ते जगले, त्यांच्या इतके नाही पण थोडेफार तर आपण देखील केले पाहिजे."

"छत्रपती शिवाजी महाराजांनी देश आणि जगाला काय संदेश दिला? त्यांच्या विचारांचे आज कोणते चिन्ह अस्तित्वात आहे तर हे (संविधान) आहे. थेट कनेक्शन आहे. जे शिवाजी महाराजांनी सांगितले, २१ व्या शतकातील त्याचे भाषांतर हे (संविधान( आहे. यामध्ये तुम्हाला अशी एकही गोष्ट आढळणार नाही ज्यासाठी ते लढले नाहीत. संपूर्ण आयुष्यभर ते लढले, त्यांनी जे काही कामे केली, त्याच विचारातून हे संविधान जन्माला आले. दुसऱ्या पद्धतीने सांगायचे झाल्यास छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराजांसारखे लोक नसते तर हे (संविधान) अस्तित्वात नसते" असे राहुल गांधी यावेळी म्हणाले.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.